सांडपाणी साचून राहिल्याने मंदिर परिसरात दुर्गंधी : त्वरित स्वच्छ करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शास्त्रीनगर परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. पण सदर काम अर्धवट करण्यात आले असून गणेश मंदिर परिसरातील नाला, कचरा आणि झाडझुडूंपानी तुडूंब भरला आहे. येथील स्वच्छता करण्याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मनपाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱया नाल्याच्या स्वच्छतेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. पावसाळय़ात शास्त्रीनगर परिसरातील नाल्याचे पाणी सर्वत्र पसरून नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे या नाल्याची स्वच्छता वेळोवेळी करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यामुळे पावसाळय़ात हा नाला भरलेला असतो. मात्र सध्या पाऊस नसताना देखील नाला तुडूंब भरला आहे. तर कचरा आणि झाडझुडुपांमुळे सांडपाण्याचा निचरा झाला नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. गुड्सशेड रोड परिसरात नाला तुंबल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात नाला स्वच्छतेचे काम मागील आठवडय़ात सुरू केले होते. पण या परिसरातील नाला स्वच्छता करून ही मोहीम बंद करण्यात आली. पण जवळच असलेल्या गणेश मंदिर परिसरातील नाला स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गणेश मंदिर व लक्ष्मी मंदिर परिसरात नाला तुडूंब भरला आहे. तसेच या परिसरात दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील गणेश मंदिरात ये-जा करणाऱया भविकांनादेखील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दर मंगळवारी मंदिरात येणाऱया भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. तसेच गणेश जयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येतात. मात्र नाला भरल्याने परिसर दुर्गंधीमय झाला आहे. नाला स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम अर्धवट झाल्याने उर्वरित परिसरातील नाल्यातील कचरा जैसेथे आहे.
महापालिकेने हे काम अर्धवट केल्याने उर्वरित नाल्याची स्वच्छता कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गणेश मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दि. 2 ते 4 मार्च दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
या नाल्यातील कचरा पावसाळय़ाच्या तोंडावर काढण्यात येतो. पण त्यावेळी देखील अर्धवट कचरा काढण्यात आल्याने पावसाचे पाणी नालाकाठावरील घरांमध्ये शिरते. तर पावसाळय़ात ही परिस्थिती कायमचीच असते. मात्र उन्हाळय़ात देखील नाला भरलेला असतो. कारण ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि झाडाझुडुपांमुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. नाल्यातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डेनेज वाहिन्यांची देखील समस्या निर्माण होते. परिसरातील नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकत असल्याने झाडाझुडुपांमध्ये अडकून सांडपाणी साचून राहण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे येथील नाल्याची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.









