वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएल स्पर्धेच्या अंतिम निर्णयासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडून कोरोना व्हायरस संदर्भातील शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा होत आहे. शासनाने 30 एप्रिलपर्यंत लॉकआऊटची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 29 मार्चपासून खेळविली जाणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोरोना महामारीमुळे 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. केंद्र शासनाकडून संचारबंदीच्या मुदतीत आणखी वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शासनाच्या अंतिम निर्णयानंतरच आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळ घेवू शकेल, असे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. लॉकडाऊनची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर करणारे ओदिशा हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर पंजाब, तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाने लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला.









