रिक्षामामांनी ‘भाच्यां’समवेत केलेली धमाल ठरली लक्षवेधी : भाच्यांना रिक्षामामांनी केली शहराची भ्रमंती, नाश्त्याचीही केली सोय
प्रतिनिधी /बेळगाव
एरव्ही रिक्षाचालक म्हटलं की उद्धट वागणारा ही प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात जणू चपखल बसून गेली आहे. त्याचा अनुभवही अनेकांना येतोय. पण मुंबईतल्या डबेवाल्यांप्रमाणेच बेळगावातले रिक्षामामा देखील त्यांच्या औदार्थपूर्ण वृत्तीने महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रवारी शाळांचा शेवटचा दिवस. यावेळी रिक्षामामांची त्यांच्या ‘भाच्यां’समवेत केलेली धमाल लक्षवेधी ठरली.
शुक्रवारपासून प्राथमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. साहजिकच 15 मेपर्यंत रिक्षामामांची भेट त्यांच्या ‘भाचरां’ना होणार नाही. त्यामुळे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या रिक्षातून दररोज प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांना एकतर शहराची सफर घडवली किंवा एखाद्या वर्गामध्ये जल्लोष साजरा केला.
खरेतर रिक्षावाला म्हणजे सर्वसामान्यांना ‘मवाली’ वाटतो. परंतु बेळगावमधील रिक्षावाल्यांचे ‘दुसरे रूप’ ज्यांनी पाहिले, त्याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. कारण एरव्ही, हिडीस फिडीस करणारे रिक्षावाले सकाळी ठरल्यावेळेत त्यांच्या नेहमीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत सोडतात व घरीही पोहचवितात. त्यामुळे पालकदेखील निर्धास्त राहू शकतात. रिक्षामामा ही बेळगावातल्या रिक्षेवाल्यांची अपरिचित ओळख आहे.
शाळेचा शेवटचा दिवस रिक्षामामांमुळे आनंदी-स्नेहल बंजारे
शुक्रवारी शहरात सर्वत्र रिक्षामामांसमवेत विद्यार्थी धमाल करताना दिसले. नेहमीच आम्ही शाळा आणि अभ्यासाच्या दडपणाखाली असतो. पण आजचा शाळेचा शेवटचा दिवस रिक्षामामांमुळे आनंदी झाल्याची प्रतिक्रिया स्नेहल बंजारे या चिमुकलीने व्यक्त केली.
वर्षभर आमच्या पोटाची खळगी याच विद्यार्थ्यांमुळे भरते-लक्ष्मण बुद्रुक
वर्षभर आमच्या पोटाची खळगी याच विद्यार्थ्यांमुळे भरते. आम्हाला कुठलाच प्रवासी आठवणीत ठेवत नाही. रिक्षाचालक सर्वांपासून अलिप्त असतानाही ही चिमुकली आमच्याशी आपुलकीने वागतात. त्यामुळे जो काळ त्यांच्यापासून दूर राहतो, त्यापूर्वी त्यांच्यासोबत आनंदोत्सव साजरा करतो, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण बुद्रुक यांनी व्यक्त केली.
दोन महिने ‘मिस’ करणं अवघड

शाळेचा शेवटचा दिवस असो किंवा सण-उत्सव असो, आम्ही नेहमीच मुलांसमवेत आनंदोत्सव साजरा करतो. त्यांच्यामुळे आमचे पोट भरते. आज माझ्या या मानलेल्या भाचरांना सकाळपासून शहर फिरवलं, नाश्ता खाऊ घातला, बागेत फिरवलं, दोन महिने त्यांना ‘मिस’ करणं अवघड आहे.
– यल्लाप्पा कृष्णा जगताप, रिक्षाचालक









