2020-21 शैक्षणिक वर्षातील सुटय़ांसंबंधीचा आदेश रद्द
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे यंदा शिक्षण खात्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्र आणि मध्यावधी सुटी रद्द केली आहे. त्यामुळे दसऱयाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मिळणारी सुटी रद्द झाली आहे. सध्या सुरू असणारा ‘विद्यागम’ कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवावा. तसेच खात्याकडून शैक्षणिक कार्यक्रमासंदर्भात देण्यात येणाऱया आदेशांचे पालन करावे, असेही आदेशपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिक्षण खात्याने 14 फेब्रुवारी 2020 रोजी 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक कार्यक्रम आणि मध्यावधी सुटीबाबत आदेश जारी केला होता. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांकरिता शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे खात्याने दसऱयानिमित्त 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत दिलेली मध्यावधी सुटी रद्द केली आहे. शिक्षण खात्याच्या संचालकांनी गुरुवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे. यंदाच्या शैक्षणिक उपक्रमासंबंधी शिक्षण खात्याकडून देण्यात येणाऱया आदेशाची कार्यवाही करावी. शिवाय 4 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यागम कार्यक्रम यापुढेही नियमित सुरू ठेवावा, असे आदेशपत्रकात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना 2 ऑक्टोबरनंतरही नियमितपणे शाळेत हजर रहावे लागणार आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपल्यानंतर 3 ऑक्टोबरपासून शाळांना दसऱयापर्यंत सुटी दिली जाते. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे अद्याप शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण, विद्यागम कार्यक्रम राबविले जात आहेत. विविध अभ्यास, अभ्यासपूरक मुद्दय़ासंदर्भात मार्गदर्शन करून मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.









