आरोग्य, शिक्षण अधिकाऱयांशी चर्चा : पुढील महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात पुन्हा बैठक : दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये डिसेंबर अखेरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी पार पडलेल्या शिक्षण खाते आणि आरोग्य खात्यातील अधिकाऱयांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेच्या तारखांचीही लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.
शाळा सुरू करण्यासंबंधी आरोग्य आणि शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर येडियुराप्पा यांनी पत्रकार परिषद घेत 31 डिसेंबरपर्यंत शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये सुरू केली जाणार नाहीत. ऑनलाईनद्वारेच शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. डिसेंबरच्या तिसऱया आठवडय़ात पुन्हा बैठक घेऊन शाळा-पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करावीत, का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदा दहावी परीक्षेला 9,59,566 विद्यार्थी बसणार आहेत. तर बारावीसाठी 5,70,126 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भविष्यातील हिताचा विचार करून जून महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे येडियुराप्पा यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग कोणत्याही कारणास्तव भरवले जाऊ नयेत. विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेपासून आलिप्त राहू नयेत यासाठी विशेष कार्यक्रमांची घोषणा करण्यात येईल. शिक्षण तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
डिसेंबरमध्ये शाळा सुरू केल्यास कोरोना संसर्गवाढीचा धोका अधिक आहे. हिवाळा कालावधीत कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोविड-19 तांत्रिक सल्ला समितीने अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. राज्यात दररोज 1700 पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये डिसेंबरपूर्वी सुरू करू नयेत, असा सल्ला आरोग्य खात्यानेही दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
खेडय़ांमध्ये बालकामगार, बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथा सतावत आहेत. त्यावरही प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे आरोग्यहित महत्त्वाचे असल्याने घाईगडबडीत शाळा सुरू करण्यात येणार नाहीत. सध्या पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार अद्याप तरी केलेला नाही. मात्र, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. यंदा आठवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जाणार नाहीत. याबाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. ऑनलाईन आणि दूरदर्शनवरील अभ्यासमालिका यापुढेही सुरू राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
निर्णय…
- ऑनलाईन, दूरदर्शनवरील अभ्यास मालिका सुरू राहणार
- ‘संवेद’ उपक्रमांतर्गत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणार
- जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्याचा बैठकीत निर्णय
दुसऱया टर्मच्या शुल्काबाबत अद्याप निर्णय नाही
अनेक खासगी शाळांनी शैक्षणिक वर्षातील दुसऱया टर्ममधील शुल्क जमा करण्यासाठी परवानगी मागितली आहे. परंतु, यासंबंधी सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. शुल्क भरलेले नाही, हे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येणार नाही. याबाबतही सरकार निर्णय घेणार आहे, असे शिक्षण खात्याच्या मुख्य सचिव उमाशंकर यांनी सांगितले.
शून्य शैक्षणिक वर्षाची घोषणा नाही
‘विद्यागम’ योजना सध्यातरी सुरू केली जाणार नाही. युटय़ूब, दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवर शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे. आता जियो टीव्हीनेदेखील मोफत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘संवेद’ उपक्रमांतर्गत दहावी इयत्तेतील अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. मात्र, शून्य शैक्षणिक वर्ष म्हणून घोषणा करणार नाही.
-एस. सुरेशकुमार, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री









