राज्यातील 50 हजारांहून अधिक शाळा-अंगणवाडय़ांत पिण्याची पाण्याची सुविधाच नाही
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील 50 हजारांहून अधिक शाळा आणि अंगणवाडय़ांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. राज्य सरकारकडे उपलब्ध झालेल्या तपशिलानुसार 19,519 शाळा व 35,043 अंगणवाडय़ांमध्ये अद्यापही नळ सुविधा नाही. राज्यातील एकूण 42,015 सरकारी शाळांपैकी फक्त 22,496 शाळांमध्ये पाण्याचे नळ आहेत. एकूण 53,901 अंगणवाडय़ांपैकी 18,885 अंगणवाडय़ांमध्ये नळाची सोय
आहे.
तथापि, आकडेवारीपेक्षा वास्तव भयंकर आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बसवराज गुरीकर यांच्या मते फक्त 5 ते 6 हजार शाळांमध्ये पाण्याची सोय आहे. सरकारची आकडेवारी धूळफेक करणारी आहे, असे ते म्हणतात. शाळांच्या आवारामध्ये कूपनलिका खोदाव्यात अशी आमची वर्षानुवर्षांची मागणी असून सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पाण्याअभावी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱयांना वणवण करावी लागते. शिवाय उपलब्ध पाण्यामध्येच त्यांना नियोजन करावे लागते. त्यातही शहर आणि ग्रामीण भागात वेगळवेगळय़ा समस्या आहेत. बहुसंख्य अंगणवाडय़ांमध्ये कर्मचाऱयांनाच पाण्यासाठी एक ते दोन कि. मी. अंतर वणवण करावी लागते. घागरी भरून आणून शाळेत ठेवणे हे त्यांचे नित्याचेच काम झाले आहे. जेथे सरकारने पंप, टाकी आणि नळ सुविधा दिली आहे तेथे पाण्याचा पत्ता नाही, असे कर्नाटक राज्य अंगणवाडी संघटनेच्या सरचिटणीस सुनंदा एच. एस. यांनी सांगितले.
जेथे अंगणवाडय़ा भाडेतत्त्वावर चालतात तेथे घरमालकांकडून किंवा शेजाऱयांकडून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने आता जलजीवन अभियान हाती घेतले आहे. 16,717 शाळा आणि 3,498 अंगणवाडय़ांमध्ये आता लवकरच अभियानांतर्गत काम सुरू होणार आहे. दरम्यान 5,000 शाळांमध्ये काम पूर्ण झाले असून 15 फेब्रुवारीपर्यंत नळ सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे ग्रामीण विकास व पंचायतराजचे मुख्य सचिव एल. के. अतिक यांनी सांगितले.









