गोवा राज्य म्हणजे उत्सवांची मांदियाळीच जणू. गोवा राज्य केवळ समुद्र किनाऱयांमुळेच नव्हे तर येथील विलोभनीय मंदिरांमुळेही प्रसिद्ध आहे. या मंदिरांमध्ये वर्षाचे बाराही महिने विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध मंदिरांच्या उत्सवात हौशी रंगभूमीवर दरवर्षी हजारो नाटय़प्रयोग होत असतात. गोव्यातील अनेक कलाकारांचे हौशी रंगभूमीवर अमुल्य असे योगदान आहे. आपले तन, मन, धन अर्पून अनेक कलाकारांनी हौशी रंगभूमीवर कला सादर करून वाहवा मिळविली आहे. यामुळे गोव्यातील नाटय़परंपरा समृद्ध बनली, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ज्याप्रमाणे गोव्यात घरागणिक माडाचे झाड आहे त्याचप्रमाणे गोव्यातील बहुतांश घरांमध्ये कलाकार निर्माण झाले आहेत व त्यांनी कलेचे दालन समृद्ध केले आहे.
गोव्यातील निसर्गरम्य पेडणे तालुक्यात पं. प्रभाकर पणशीकर यांच्यासारखे नाटय़कर्मी जन्मले. त्याकाळी गोव्यात कलेला संधी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी मुंबई गाठली व नाटय़कलेमध्ये उत्तंgग भरारी घेत केवळ पेडणे तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण गोव्याचे नाव उंचावले. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने तर त्यांना यशोशिखरावर आरूढ केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पेडणेत हल्लीच एक कार्यक्रम आयोजिण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन निश्चितच नवीन नाटय़कलाकार उदयास येतील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करणे आवश्यक ठरते. अशा या पेडणे तालुक्यात हौशी रंगभूमीवर अनेक कलाकार निर्माण झाले आहेत. त्यामध्ये भंडारवाडा-पालये येथील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व शामसुंदर श्रीधर मांद्रेकर यांचा उल्लेख करावा लागेल.
शामसुंदर मांद्रेकर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1969 साली झाला. म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कारकून म्हणून सेवा बजावतानाच त्यांनी नाटय़कलेची सेवा बजावली आहे. त्यांचा नाटय़कलेचा प्रवास उल्लेखनीय म्हणावा लागेल. त्यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत ज्ञानप्रसारक मंडळाच्या कुशे कॉलेज ऑफ कॉमर्स म्हापसा येथे झालेले आहे. नाटक, भजन, चित्रकला व मूर्तीकला हे त्यांचे छंद. 1988 मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात शंभुराजे नाटिकेमधून त्यांनी नाटय़ क्षेत्रात पदार्पण केले. मूळातच मांद्रेकर यांचे घराणे कलाकारांचे. त्यात पारंपरिक पिढीजात कलाकार, नामवंत मूर्तिकार, कुशल गवंडी कारागीर, रंगकामात प्राविण्य, त्यांचा एक भाऊ नाटय़कलाकार तर कोणी गायनात निपुण. अशी कलेची पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला.
नाटक व भजनाची मांद्रेकर यांना लहानपणापासूनच आवड. शालेय वयातच त्यांनी विविध नाटिकांमध्ये सहभाग दर्शविला. तसेच उत्सवाप्रीत्यर्थ होणाऱया हौशी रंगभूमीवरील छोटय़ा-मोठय़ा भूमिका करण्यासाठी त्यांची धडपड असायची. दहावी इयत्तेत असताना त्यांनी ‘घरदार’ या सत्यवान पालयेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात ‘पप्पा’ची प्रमुख भूमिका वठविली. नंतर प्रत्येकवर्षी उत्सवाप्रीत्यर्थ होणाऱया नाटकात वाडय़ातर्फे भाग घेण्याची संधी त्यांना मिळत गेली. त्यामुळे नंतर सलग पाच वर्षे सत्यवान पालयेकर यांच्या दिग्दर्शनाखाली देवाघरचा न्याय, जन्मदाता, पंढरपूर, पारिजात मी तुझ्या अंगणी, अखेरचा जखमी, लोक सिंहासन अशा नाटकांमधून त्यांनी भूमिका वठविल्या. सत्यवान पालयेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या हौशी महोत्सवी नाटकात 60 वर्षांच्या मास्तरांची भूमिका मांजरेकर यांनी 18 वर्षांचा असताना सक्षमपणे केली. त्यामुळे गावातून त्यांचे कौतुक झाले होते.
1988 साली कोरगाव येथील एका संस्थेतर्फे पंधरा दिवशीय नाटय़ शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शामसुंदर मांद्रेकर यांनी सहभाग दर्शविला. शिबिराचे मार्गदर्शक नामवंत दिग्दर्शक अभय जोग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ हे नाटक पेठेचावाडा-कोरगाव येथे सादर करण्यात आले. त्यात मांद्रेकर यांचा सहभाग होता.
नाटय़क्षेत्राप्रमाणे मांद्रेकर यांना भजनाचीही आवड. संगीत शिक्षक रामनाथ अनंत नाईक यांच्याकडे त्यांनी भजनाचे धडे घेतले. तेव्हापासून संगीत नाटकांमध्ये भूमिका सादर करण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. सिद्धी उत्कर्ष कला मंडळाने सादर केलेल्या ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ या नाटकामध्ये त्यांनी स्मृती भटजीची भूमिका साकारली. नंतर याच संस्थेतर्फे सादर झालेल्या संगीत अमृत मोहिनी, मदनाची मंजिरी, मंदारमाला, कृष्णार्जुन युद्ध, कटय़ार काळजात घुसली, मत्स्यगंधा, तुका आकाशा एवढा, सौभद्र, संत गोरा कुंभार, भाव तोची देव, धनुर्भंग, कैकयी या नाटकात भूमिका वठविल्या. नंतर श्री महादेव कला मंच पालयेतर्फे निर्मित सं. जय जय गौरीशंकर, कधीतरी कोठेतरी, ययाती आणि देवयानी, लावणी भुलली अभंगाला, हे बंध रेशमाचे, घनशाम नयनी आला आदी नाटकांमध्ये भूमिका साकारून वाहवा मिळविली. आजपर्यंत विविध ठिकाणी सादर झालेल्या 180 हून अधिक नाटय़प्रयोगात त्यांनी भूमिका वठविल्या आहेत.
नाटकानिमित्त गोव्यातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र संगीत नाटय़स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या सं. मदनाची मंजिरी नाटकात त्यांनी सदानंद ही भूमिका वठविली. या भूमिकेला त्यांना अभिनयासाठी पारितोषिक प्राप्त झाले. तसेच ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ नाटकात सादर करण्यात आलेल्या स्मृती भटजी या भूमिकेसाठीही त्यांना पारितोषिक प्राप्त झालेले आहे. गोमंतक मराठी अकादमी संगीत नाटय़स्पर्धेत, कला अकादमी तसेच महाराष्ट्र हौशी संगीत नाटय़ स्पर्धा, अहमदनगर, गोव्यातील विविध संस्थांनी आयोजित केलेल्या नाटय़ स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. गोव्यातील नामवंत दिग्दर्शक सत्यवान अनंत पालयेकर, अभय जोग, रामदास कृष्णा परब, विजय तुळसकर, दिलीप गोसावी, गजानन नार्वेकर, रमेश परब केळकर, कमलाकर परब यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सतत मनसोक्त प्रसन्न हसरा चेहरा, मितभाषी, नाटकाला पूरक असा भरगच्च पहाडी आवाज, देखणे रूप, साजेशी शरीरयष्टी ही तर त्यांची जमेची बाजू असली तरी चोख आणि चांगले पाठांतर, अभ्यासूवृत्ती यामुळेच त्यांनी अनेक भूमिका सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे ते अभिनय करताना स्वतः त्यात पूर्ण रंगून जातात. सहकार क्षेत्र सांभाळून त्यांनी नाटय़कलेला न्याय मिळवून दिलेला आहे. या कलाकाराची दखल गोवा सरकारने घेणे आवश्यक ठरते.
राजेश परब








