प्रतिनिधी / कुंकळ्ळी
किटल-फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव यंदा गुरुवार 25 ते शनिवार 27 असे तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे. यंदा धार्मिक विधींशिवाय अन्य सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
देवस्थानचे अध्यक्ष दिलीप देसाई, चिटणीस विराज राऊत देसाई, खजिनदार महेश देसाई, मुखत्यार संजू देसाई हे नवे मंडळ कार्यरत असून त्यांनी कोविडमुळे जत्रोत्सवासंबंधी विशेष खबरदारी घेतली आहे. यावेळी सरकारी नियमांचे पूर्णपणे पालन केले जाणार आहे. महाजन, कुळावी, भक्तगण व ग्रामस्थ यांनी सॅनिटायजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवार 25 रोजी पहिल्या दिवशी सकाळी यजमानास प्रायश्चित विधी, गणपतीपूजन, प्रार्थना, श्री भूमिपुरुषास लघुरूद्र सेवा, नंतर श्रींची महापूजा, प्रसाद होईल, तर रात्रीs 9.30 वा. श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. दुसऱया दिवशी शुक्रवार 26 रोजी सकाळी नवचंडी वाचन, पूर्णाहुती, दुपारी 12.30 वा. श्रींची महापूजा, आरती वगैरे, रात्री 10 वा. श्रींची सिंहरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद वगैरे होईल. तिसऱया दिवशी शनिवार 27 रोजी सकाळी श्रींची महापूजा, आरती वगैरे, रात्री 11.30 वा. पालखी, शिबिकोत्सव व नंतर 12 वा. महारथातून मिरवणूक, तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.









