नियंत्रण रेषेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुखांचे सुतोवाच
वृत्तसंस्था / श्रीनगर
गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रण रेषेवर शांतता असली तरीही भारतीय सैन्याने पूर्ण सतर्क होण्याची गरज असल्याचे सुतोवाच लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी केले आहे. लष्करप्रमुख नरवणे सध्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱयावर असून त्यांनी व्हॅलीमधील विविध भागांची पाहणी करत आढावा बैठकाही घेतल्या. दौऱयाअंती नियंत्रण रेषेवरील सध्याच्या स्थितीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जनरल नरवणे यांनी सैनिकांना कोणत्याही आपत्कालीन सुरक्षा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यात फार मोठा संघर्ष झालेला नाही. पाकिस्तानी सैन्याने गेल्या 100 दिवसांच्या काळात शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले नाही. दहशतवादी कारवाया छुप्या पद्धतीने सुरू असल्या तरीही त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न लष्कराकडून केला जात आहे. कारवाया कमी झाल्या असल्या तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरक्षा दल सीमेवर सदैव सतर्क असल्याचा दावा लष्करप्रमुखांनी केला आहे.
गुरुवारी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) महत्त्वाच्या तळांवर जाऊन सैन्याच्या कार्यवाहीच्या तयारीची माहिती घेतली. जनरल नरवणे यांच्यासमवेत उत्तरी कमांडचे मुख्य कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी आणि श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे हेही उपस्थित होते. यावेळी स्थानिक कमांडर्सनी सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याबद्दल लष्करप्रमुखांना सविस्तर माहिती दिली. लष्करप्रमुखांनी सैनिकांची भेट घेऊन नियंत्रण रेषा व काश्मीर खोऱयात शांतता राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.









