शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर येथील एक महिला आपल्या 8 वर्षांच्या मुलीसह गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या कुटुंबीयांनी सोमवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मालाराणी निरंजन प्रामाणिक (वय 26) व मुलगी मानवी (वय 8) या दोघी 26 मे रोजी रात्री 9 पासून बेपत्ता झाल्या आहेत. मालाराणीचे वडील शंभूचरण गोविंद मन्न यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून आपली मुलगी व नातीचा शोध घेण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
मालाराणीचा पती निरंजन हा शहापूर येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यावेळी पतीला भेटुन येण्याचे सांगून मालाराणी घराबाहेर पडली आहे. दहा दिवस उलटले तरी माय-लेक घरी परतले नाहीत, म्हणून सोमवारी पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. हे कुटुंबीय मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत. या दोघा जणांविषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405244 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









