शासनाने परवानगी दिलेली दुकाने राहणार सुरु, -प्रतिबंधीत क्षेत्रातील दुकाने राहणार बंदच
सोलापूर / प्रतिनिधी
शहरी भागात शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर शनिवार पासून सुरु झाली आहेत. मात्र प्रतिबंधीत क्षेत्रातील दुकाने बंदच राहतील, असा आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी काढला.
महापालिका हद्दीतील केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर मध्ये हेअर कट, हेअर डाय, व्हॅक्सिंग या कामांना परवानगी दिली आहे. तर त्वचेशी संबंधित सेवा दाढी, फेशियल, मसाज या कामांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्या सेवा मिळणार नाहीत त्याची माहिती दर्शविणारा फलक दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे लावणे दुकानदारांना बंधनकारक आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या चालक, कर्मचाऱ्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्लोज, ऍप्रन व मास्कचा वापर करावा. कामाच्या ठिकाणी खुर्च्या प्रत्येक वेळी सेवा दिल्यानंतर निर्जंतुक कराव्यात. दुकानातील वापरातील भाग, जमिनीचा पृष्ठभाग दर दोन तासांनी निर्जंतुक करावा. ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन याचा वापर करावा. नॉन डिस्पोजेबल साधनाचा प्रत्येक वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे. तसेच सदरचे नियम व अटी न पाळणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.









