नूतन पोलीस आयुक्तांची अधिकाऱयांना सूचना : डॉ. बोरलिंगय्या यांनी स्वीकारली सूत्रे
प्रतिनिधी /बेळगाव
नूतन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली आहे. शहर व उपनगरातील गैरधंदे खपवून घेतले जाणार नाहीत. ते त्वरित बंद करा. कामानिमित्त येणाऱया नागरिकांशी सौजन्याने वागा, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी अधिकाऱयांना केली आहे.
शनिवारी दुपारी डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सूत्रे स्वीकारली. सायंकाळी मावळते आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या सत्कार समारंभात भाग घेतला. रविवारी लगेच त्यांनी शहरातील अधिकाऱयांची बैठक घेऊन तंबी दिली असून कोणत्याही परिस्थितीत गैरधंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शहर व उपनगरातील चोऱया, घरफोडय़ा व इतर प्रकारची गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे रात्रीची गस्त व बिटमधील कामे करावीत. कामानिमित्त पोलीस स्थानकात येणाऱया नागरिकांशी सौजन्याने वागावे. आपल्या कार्यक्षेत्रातील गैरधंदे त्वरित थोपविण्यात यावेत. अशा सूचना त्यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह शहरातील सर्व एसीपी, पोलीस निरीक्षक आदी अधिकारी उपस्थित होते. नूतन आयुक्तांनी केलेल्या सूचना पाहून अनेक अधिकाऱयांना धक्काच बसला आहे. कारण बेळगावात सध्या सर्व प्रकारचे गैरधंदे उघडपणे सुरू आहेत. काही अधिकारीच गैरधंदेचालकांना भेटून आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका, असा धीर देत होते. आता नूतन पोलीस आयुक्तांनी तंबी दिल्यामुळे गैरधंद्यांच्या समर्थकांचे धाबे दणाणले आहेत.
यासंबंधी रविवारी रात्री ‘तरुण भारत’ने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असता अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.









