पहाटेपासून शिवमंदिरांमध्ये धार्मिक पूजा, शिवनामस्मरण, शिवभजनासह विविध कार्यक्रम : भाविकांची दर्शनासाठी गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात गुरुवारी महाशिवरात्री उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पहाटेपासून शिवमंदिरांमध्ये धार्मिक पूजा, शिव नामस्मरण, शिवभजन, पारायण, जागर यासह विविध कार्यक्रम पार पडले. कोरोनामुळे महाशिवरात्रीचा कार्यक्रम साधेपणाने झाल्याचे पहायला मिळाले. कोरोनाचे नियम पाळत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवषीप्रमाणे आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला होता. शहर परिसरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे मंदिरे भक्तांनी फुलली होती.
शहरातील मिलिटरी महादेव मंदिर, शहापूर येथील मुक्तीधाम, जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर, आनंदनगर, विजयनगर व शाहूनगर येथील शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्री साजरी करण्यात आली. मंदिरांमध्ये आकर्षक आरास करण्यात आली होती.
कपिलेश्वर मंदिर
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरात गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे 6 वाजता, दुपारी 12 वाजता व दुपारी 3 वाजता रुद्राभिषेक करण्यात आला. रात्री 9 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 12 ते 4 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंदिरातील अग्निहोत्र शाळेत परशुरामांच्या मूर्तींचे अनावरण करण्यात येणार आहे.
गोवावेस, पंचवटी रिक्षा स्टॅण्ड शिवमंदिर
गोवावेस येथील पंचवटी रिक्षा स्टॅण्ड शिवमंदिरात गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरवषीप्रमाणे पहाटे अभिषेक करण्यात आला. 25 भक्तांच्या उपस्थितीत होमपूजन करण्यात आले. मंदिरात दिवसभर खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
उप्पार गल्ली, खासबाग शिवमंदिरात महाशिवरात्री
उप्पार गल्ली, खासबाग येथील शिवमंदिरात केएलई आयुर्वेदिक फार्मसी कॉलेजतर्फे महाशिवरात्री साजरी करण्यात आली. केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. बी. एस. प्रसाद यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा झाली. याप्रसंगी डॉ. अजित लिंगायत, डॉ. सविता भोसले, डॉ. अशोक पाटील, डॉ. सुकशा, तानाजी सावळे, विनोद पाटील यांसह कर्मचारी उपस्थित होते.
गणेशपूर-अयोध्यानगर
अयोध्यानगर, गणेशपूर येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी मंदिरात 8 वाजता महारुद्राभिषेक झाला. सायंकाळी 7 वाजता महाआरती झाली. रात्री 9 वाजता भजनाचा कार्यक्रम झाला.
शहापूर मुक्तीधाम
शहापूर मुक्तीधाम येथील शिवमंदिरात गुरुवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी मंदिरात अभिषेक व महापूजा झाली. भारतनगर येथील माता शक्ती महिला मंडळाने दिवसभर भजन सादर केले. कोरोनाचे नियम पाळून भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवषीप्रमाणे आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे.
शनिवार खूट महादेव आर्केड
शनिवार खूट, महादेव आर्केड येथील महादेव देवस्थानात गुरुवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी 9 ते दुपारी 12 यावेळेत लघुरुद्राभिषेक व महामृत्यूंजय होमहवन झाले. सकाळपासूनच भक्तांनी दर्शनाचा लाभ
घेतला.
शहापूर खडेबाजार
शहापूर खडेबाजार येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी अभिषेक करून महापूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत दर्शन घेतले.









