प्रतिनिधी /बेळगाव

शहर परिसरात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी मोठय़ा उत्साहात आणि भक्ती भावाने साजरी झाली. यानिमित्ताने गणेश मंदिरातून पहाटेपासून अभिषेक, पूजा, आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी गणेश मंदिरातून गर्दी केली होती. गणेश मंदिरातून खास मूर्तींवरती फुलांची आरास करून सजविण्यात आले होते.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील मिलिटरी विनायक मंदिर, चन्नम्मा चौकातील गणेश मंदिर, विजयनगर स्वयंभू गणपती मंदिर, गणपत गल्ली येथील गणपती मंदिर, पांगुळ गल्ली येथील सिद्धी विनायक मंदिर, अनसुरकर गल्ली येथील गणपती मंदिर यासह शहापूर नार्वेकर गल्ली, खडेबाजार येथील गणेश मंदिरातून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मिलिटरी विनायक मंदिरमध्ये सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यासह उपनगरातील गणेश मंदिरातून देखील भाविकांची वर्दळ वाढली होती. चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरामध्ये देखील विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठय़ा संख्येने दर्शन घेतले.









