बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत असल्याने दिवसा उष्मा वाढत आहे. पहाटे व रात्री थंडी जाणवत असली तरी दिवसभर उष्णतेत वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून शहराच्या तापमानात वाढ होत असून गुरुवारी शहराचा पारा 34.1 अंशांवर पोहचला होता. उकाडय़ात वाढ झाल्याने दिवसभर आता पंख्यांची घरघर वाढली असून कार्यालयातून देखील एसीचा वापर वाढला आहे.
फेब्रुवारीत ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. आता आठवडय़ाभरापासून दुपारच्या वेळी उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबूज, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आइस्क्रीम, ज्युस यासारख्या शीतपेयांकडे नागरिकांची पावले वळत आहेत.
हिवाळा ऋतू संपला असून उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत आहे. मागील आठवडय़ात अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. अधून-मधून ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात अवकाळी पाऊस झाला होता. गेल्या आठवडय़ाभरापासून सकाळपासून उष्मात हळूहळू वाढ होत असून दुपारच्यावेळेत नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत थंडपेयांना देखील मागणी वाढत आहे.









