ऑनलाईन टीम / मुंबई :
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. तसच शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केला असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्याच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला आहे.
शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे. पवारांबद्दल बोललं की महान नेता असा भाजपात गोड समज आहे. त्यामुळे हा त्या प्रयत्नाचा भाग आहे. हे ज्यांना नेता मानतात तेच नरेंद्र मोदी आपण शरद पवारांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचं बोलतात, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.









