ऑनलाइन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने भाजपवर जोरदार टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवरायांची जाणता राजा ही उपाधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना लावली जाते. हे कसं चालतं ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते म्हणाले, जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. तसेच इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे.
तसंच यावेळी त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, विरोधक राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत नीच दर्जाचे राजकारण केलं जात आहे.