ऑनलाईन टीम / जळगाव :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. मात्र कोरोनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर खडसे क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून हा दौरा तूर्तास रद्द केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीही स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार होते. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार होते. शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती.
विशेष म्हणजे खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून हा पहिलाच जाहीर दौरा आयोजित केला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीसह खडसे समर्थकांकडून जोरदार शक्तप्रदर्शन केले जाण्याची शक्यता होती. शरद पवारांच्या या दौऱ्यासाठी खास नियोजनही करण्यात आले होते. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. शरद पवारांचा हा दौरा येत्या काळात पुन्हा आयोजित केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र याची तारीख किंवा ठिकाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.