ऑनलाईन टीम / पिंपरी चिंचवड :
पिंपरी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले. साने यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले.

शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे म्हणून साने यांना मानले जात होते. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर 22 जून रोजी दत्ता साने यांचा स्वॅब घेतला होता, दोन दिवसानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर तातडीने खासगी रुगणलायत उपचार सुरू केले. परंतु त्यांना न्यूमोनिया, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. शेवटच्या क्षणी त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता अशी माहिती समोर आली होती. कोरोनाशी लढा देत असताना अखेर उपचारा दरम्यान त्यांचे शनिवारी निधन झाले.
दरम्यान, यावेळी चिखली ग्रामस्थांनी बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी शरद पवारांकडे केली.








