मोहम्मद शमीचे 4, इशांतचे 3 बळी, अश्विनला दुहेरी यश, कर्णधार विल्यम्सनची लक्षवेधी झुंज
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
मोहम्मद शमी (4-76), इशांत शर्मा (3-48) व अश्विन (2-28) यांनी भेदक मारा साकारला असला तरी न्यूझीलंडने येथील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये सर्वबाद 249 धावांची मजल गाठत डावाअखेर 32 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. किवीज कर्णधार केन विल्यम्सनने लक्षवेधी खेळ साकारत 177 चेंडूत 49 धावांची खेळी साकारली. अर्धशतकाने हुलकावणी दिली असली तरी फलंदाजीला प्रतिकूल खेळपट्टीवर त्याचे ठाण मांडून उभे राहणे किवीज संघासाठी महत्त्वाचे ठरले.
या लढतीत सातत्याने पावसाचा व्यत्यय येत राहिला असला तरी मंगळवारचा पाचवा दिवस बराच फलद्रूप ठरला. दिवसाच्या प्रारंभी किंचीत संततधार झाल्याने खेळाला उशिरा सुरुवात झाली असली तरी त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली व दिवसभराचा खेळ होऊ शकला. या सामन्यात सहावा दिवस खेळासाठी राखीव आहे.
फुल्लर इंग्लिश लेंग्थवर गोलंदाजी करणाऱया शमीने भेदक मारा केल्यानंतर दिवसातील पहिल्या सत्रात न्यूझीलंडची दाणादाण उडाली आणि यामुळे त्यांचे मोठय़ा धावसंख्येचे मनसुबे पार धुळीस मिळाले होते. अगदी इशांत शर्माने देखील त्याला पूरक साथ देत उत्तम गोलंदाजी साकारली. या दोन्ही अनुभवी गोलंदाजांनी किवीज फलंदाजांवर सातत्याने दडपण राखले.
केन विल्यम्सनच्या संघाला दिवसभरातील पहिल्या सत्रात 23 षटकांमध्ये केवळ 34 धावांची भर घालता आली, यावरुनच भारतीय गोलंदाजांच्या काटेकोर गोलंदाजीची प्रचिती येईल. एरवी स्टायलिश, आक्रमक फलंदाजी साकारणाऱया अनुभवी केन विल्यम्सनला देखील येथे सावध पवित्र्यावर भर देणे भाग पडले होते.
रॉस टेलर (37 चेंडूत 11) शमीचे सावज ठरला. सातत्याने फुल्लर लेंग्थ मारा करणाऱया शमीने किवीज फलंदाजांना ड्राईव्हचा फटका खेळण्याच्या मोहात पाडले आणि किवीज फलंदाजही यात सातत्याने बळी पडत राहिले. शॉर्ट कव्हरवरील शुभमन गिलने हवेत झेपावत रॉस टेलरचा अप्रतिम झेल टिपला.
नंतर इशांतने हेन्री निकोल्सला (7) दुसऱया स्लीपमधील रोहित शर्माकरवी झेलबाद करत आणखी एक धक्का दिला. आपला शेवटचा कसोटी सामना खेळत असलेल्या बीजे वॅटलिंगला (1) स्वस्तातच परतावे लागले. पहिल्या सत्रापासूनच भेदक मारा साकारत असलेल्या शमीने ऑफ बेल उद्ध्वस्त करत वॅटलिंगला तंबूचा रस्ता दाखवला. यामुळे, एकवेळ उत्तम स्थितीतील किवीज संघाची पाहता पाहता 5 बाद 135 अशी पडझड झाली.
दिवसभरात जसप्रित बुमराहने उत्तम टप्प्यावर भेदक मारा साकारला. मात्र, बळीच्या निकषावर त्याची पाटी कोरी राहिली. त्याला यश लाभत नसल्याचे पाहत विराटने शमी व इशांत या जोडगोळीला गोलंदाजीच्या स्ट्राईकवर ठेवणे पसंत केले. विराटने बुमराहऐवजी शमीला माऱयावर आणले, तेथूनच सारे फासे भारताच्या बाजूने पडत गेले. प्रतिकूल स्थिती पाहता, केन विल्यम्सनने यष्टीबाहेरील चेंडू सोडून देण्याचा जणू सपाटाच लावला. मात्र, नंतर तो स्वतः 8 व्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. त्याला इशांतने कोहलीकरवी झेलबाद केले. विल्यम्सनने 177 चेंडूत 6 चौकारांसह 49 धावांचे योगदान दिले. साऊदी शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि येथे न्यूझीलंडचा डाव 99.2 षटकात सर्वबाद 249 धावांवर संपुष्टात आला.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 217.
न्यूझीलंड पहिला डाव ः टॉम लॅथम झे. कोहली, गो. अश्विन 30 (104 चेंडूत 3 चौकार), डेव्हॉन कॉनवे झे. शमी, गो. इशांत 54 (153 चेंडूत 6 चौकार), केन विल्यम्सन झे. कोहली, गो. इशांत 49 (177 चेंडूत 6 चौकार), रॉस टेलर झे. शुभमन, गो. शमी 11 (37 चेंडूत 2 चौकार), हेन्री निकोल्स झे. रोहित, गो. इशांत 7 (23 चेंडूत 1 चौकार), बीजे वॅटलिंग त्रि. गो. शमी 1 (3 चेंडू), कॉलिन डे ग्रँडहोम पायचीत गो. शमी 13 (30 चेंडूत 1 चौकार), काईल जेमिसन झे. बुमराह, गो. शमी 21 (16 चेंडूत 1 षटकार), टीम साऊदी त्रि. गो. जडेजा 30 (46 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), नील वॅग्नर झे. रहाणे, गो. अश्विन 0 (5 चेंडू), ट्रेंट बोल्ट नाबाद 7 (8 चेंडूत 1 चौकार). अवांतर 26. एकूण 99.2 षटकात सर्वबाद 249.
गडी बाद होण्याचा क्रम
1-70 (लॅथम, 34.2), 2-101 (कॉनव्हे, 48.4), 3-117 (रॉस टेलर, 63.1), 4-134 (निकोल्स, 69.3), 5-135 (वॅटलिंग, 70.2), 6-162 (ग्रँडहोम, 82.1), 7-192 (जेमिसन, 86.6), 8-221 (केन विल्यम्सन, 93.6), 9-234 (वॅग्नर, 96.3), 10-249 (साऊदी, 99.2).
गोलंदाजी
इशांत शर्मा 25-9-48-3, जसप्रित बुमराह 26-9-57-0, मोहम्मद शमी 26-8-76-4, रविचंद्रन अश्विन 15-5-28-2, रविंद्र जडेजा 7.2-2-20-1.









