92 जण कोरोनामुक्त झुवारीतील 150 पैकी 98 बाधित
प्रतिनिधी/ पणजी, मडगाव
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतच असून काल शनिवारी नव्याने 180 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा 1425 झाला आहे. झुआरी ऍग्रोही आता कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. झुवारीने 150 कंत्राटी कामगारांची चाचणी केली होती. त्यापैकी 98 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वास्कोत हाहाकार माजला आहे.
एका बाजूने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसऱया बाजूने या रुग्णांना कुठे ठेवायचे हाही प्रश्न निर्माण झाला आहे. कुठ्ठाळीत सर्वाधिक 365 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वास्कोतील रुग्णसंख्या 272 असल्याचे नमूद केले आहे. आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार हा आकडा देण्यात आला आहे. डिचोलीची कोरोनाबाधित रुग्णसंख्या 10 झाली आहे. सांखळीतील कोरोनाबाधितांची संख्या 52 झाली आहे. पेडणेत 18, वाळपईत 23, म्हापसा 38, पणजी 18 रुग्ण आहेत. चिंबल येथील रुग्णसंख्या 93 झाली आहे.
बेतकी 42, कांदोळी 29, कासारवर्णे 6, कोलवाळ 5, खोर्ली 23, शिवोली 7, पर्वरी 22, कुडचडे 10, काणकोण 6, मडगाव 42, बाळ्ळी 10, कासावली 8, कुडतरी 10, लोटली 33, मडकई 15, केपे 25, शिरोडा 17, धारबांदोडा 24, फोंडा 49, नावेली 16 अशी कोरोनाबाधितांची संख्या आहे. अजून 3493 चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. काल शनिवारी 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. दिवसाला किमान 150 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये जागा अपुऱया पडू लागल्या आहेत. त्यामुळे नव्याने पॉझिटिव्ह आढळून येणाऱया रुग्णांना घरातच थांबण्याचे आदेश दिले जात आहे. कोरोनाचा संसर्ग संपूर्ण राज्यभर पसरला आहे.
सासष्टी तालुक्यातील सर्व कोरोना केअर सेंटर रुग्णांनी भरली आहेत. सासष्टीत कोलवा टुरिस्ट रेसिडेन्सी, मडगाव रेसिडेन्सी, टी. बी. हॉस्पिटल मडगाव या ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली आहे. त्याच बरोबर फोंडा तालुक्यात शिरोडा, फर्मागुडी टुरिस्ट रेसिडेन्सी, आयटीआय फर्मागुडी, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल्स या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेली आहे. ती सर्व रुग्णांनी भरून गेलेली आहेत.
उत्तर गोव्यातील देखील जवळपास अशीच परिस्थिती आहे. परंतु दक्षिण गोव्यात मांगोरहिल, जुवारी नगर या भागातून आजही मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने समस्या गंभीर बनलेली आहे. दरम्यान, या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही, धड चांगले जेवण मिळत नाही, अशा तक्रारी देखील पुढे येत आहे.
तालुकावार कोविड केअर सेंटरसाठी हालचाली
आता तालुकावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्यादृष्टीने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. खुद्द राज्यपालांनी तसा आदेश सरकारला दिला आहे. सध्या जे लक्षणे नसलेले रुग्ण आढळून येतात, त्यांना घरातच थांबवून उपचार करावे असा मुद्दाही पुढे येत आहे. अन्य राज्यांनी लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरातच थांबवून घेतले जात आहे. जर लक्षणे नसलेल्या रुग्णांपैकी कुणाला बरे वाटत नसेल तर त्यांना हॉस्पिटलात न्यावे, असाही विचार पुढे येत आहे..
90 वर्षीय महिलेची कोविडवर मात
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात आजवर 18 जणांचे कोविडमुळे बळी गेले. त्यामुळे कोविड हॉस्पिटल नेहमीच चर्चेत राहिले. मात्र, या हॉस्पिटलातून अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात शुक्रवारी एक 90 वर्षांची महिला कोविडवर मात करून आपल्या घरी परतली आहे.
विशेष म्हणजे या महिलेला जेव्हा कोविड हॉस्पिटलमध्ये आणले होते, तेव्हा तिची प्रकृती नाजूक होती. तसेच तिला अन्य आजारही होते. या 90 वर्षीय महिलेवर कोविड हॉस्पिटलमध्ये तब्बल 23 दिवस उपचार सुरू होते. तिला मानसिक आजार होता तसेच जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते, तेव्हा ती कुपोषित होती. कोविड हॉस्पिटलातील डॉक्टर तसेच नर्सेस यांनी तिची योग्य ती काळजी घेतल्याने ती कोविडवर मात करण्यात यशस्वी ठरली. 90 वर्षाचे रुग्ण देखील बरे होऊ शकतात हे तिने सिद्ध करून दाखविले.
दरम्यान, काल कोविड हॉस्पिटलातून तिघांना डिस्चार्ज देण्यात आला तर 11 नवीन रुग्ण हॉस्पिटलात भरती झाले. सध्या कोविड हॉस्पिटलात 129 जणांवर उपचार सुरू आहेत. या हॉस्पिटलातून लक्षणे नसलेल्या 16 जणांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
दरम्यान, आमदार क्लाफास डायस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.









