तब्बल तीन ते चार वर्षे झाली तरी दुर्लक्ष, प्रवाशांची लुट सुरुच, आरटीओ चा निष्क्रियपणा कारणीभूत
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रवाशांना सोयीचे आणि खर्चीक बाब नको या दृष्टिकोनातून शहरात प्रिपेड रिक्षा केंद्रे सुरू करण्यात आली होती. मोठा गाजावाजा करून शहराच्या तीन वेगवेगळय़ा भागात सुरू करण्यात आलेली प्रिपेड ऑटोरिक्षा केंद्रे कुचकामी ठरली आहेत. शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी होत नाही. अशात प्रिपेड केंद्रांवर प्रवासी जाऊन पोहोचत नाहीत. यामुळे या केंद्रांची अवस्था बिकट बनली असून आरटीओ विभागाचा निष्किय कारभार त्यास कारणीभूत ठरला आहे. तेंव्हा याबाबत जिल्हाधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मोठय़ा कार्पोरेट शहरांमध्ये प्रिपेड रिक्षास्थानकांचा मोठा बोलबाला आहे. मुंबई, बेंगळूर, चेन्नईसह इतर ठिकाणी मीटरप्रमाणे भाडे आकारणी करण्यावर भर दिला जात आहे. याचबरोबर आता ऑनलाईन बुकिंगकडे नागरिक वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत बेळगाव शहरात मात्र प्रिपेड रिक्षाकेंद्रे कुचकामी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बेळगावात सर्वप्रथम रेल्वे स्थानकावर प्रिपेड ऑटोरिक्षा स्थानक सुरू करण्यात आले. याची कार्यवाही जेमतेमच असताना ती सुधारण्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि हॉटेल रामदेव अशा दोन ठिकाणी प्रिपेड ऑटोरिक्षा स्थानकांची उभारणी प्रशासनाने केली होती.
या तिनही प्रिपेड रिक्षा केंदांपैकी एकही स्थानक सध्या सुरू नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थानके सुरू करताना तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनाही रिक्षाचालकांचा विरोध सोसावा लागला होता. यामुळे या योजनेला रिक्षाचालकांचा कितपत प्रतिसाद मिळणार, हा प्रश्नच होता. प्रिपेड स्थानके सुरू झाल्यास कि.मी.वर निर्धारित करण्यात आलेल्या दराने प्रवासभाडे स्वीकारावे लागते. दरम्यान, या तिन्ही ठिकाणी या स्थानकांवर प्रवासी पोहोचूच नयेत, अशी व्यवस्था रिक्षाचालकांनी केल्यामुळे त्यांचे अस्तित्व झाकोळून गेले आहे. तर परिणामी याचा फटका सर्वसामान्यांना बसला. मात्र अजूनही याबाबत उदासीन भूमिका असल्याचे दिसून येत आहे. आरटीओ व पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविण्याची गरज आहे.
बेळगाव शहरात ऑटोरिक्षा भाडे आकारणीच्या बाबतीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा फटका सर्वच नागरिकांना बसतो आहे. यामुळे ठिकठिकाणी प्रिपेड ऑटोरिक्षा स्थानक उभे करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. प्रायोगिक तत्त्वावर मध्यवर्ती बसस्थानक आणि रामदेवनजीक प्रिपेड स्थानक उभे करण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. त्यापैकी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू झाल्यामुळे तेथील स्थानक हटले गेले आहे. रामदेवनजीक प्रिपेड स्थानक एकही दिवस चालू शकलेले नाही. तर सर्वात जुन्या रेल्वे स्थानकावरील प्रिपेड केंद्रावर कोणतीच कार्यवाही होत नाही. या प्रकारावर योग्य नियंत्रण ठेवण्यात आरटीओ प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसते आहे.
ही स्थानके सुरू करताना यापुढील काळात रिक्षा प्रवास करताना नागरिकांनी दर निश्चिती करून तसेच पहिल्यांदा भाडे जमा करून रिक्षासेवा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र नागरिकांचेही उदासीन धोरण याबाबतीत तितकेच कारणीभूत ठरले आहे. प्रिपेड ऑटोरिक्षा स्थानक रिक्षाचालकांना त्रासदायक ठरेल, अशी भूमिका मांडत रिक्षा संघटनांनी आपला विरोधी सूर कायम ठेवला आहे. यामुळे बेळगावातील रिक्षा व्यवसायाला शिस्त लागण्याची शक्मयता पूर्णपणे मावळली आहे. परिणामी आतातरी याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.









