येळ्ळूर रोड वडगाव येथील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा विविध समस्या असतानाच जलवाहिनी आणि व्हॉल्वच्या गळतीमुळे पाणी वाया जात आहे. येळ्ळूर रोड, वडगाव परिसरात व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात पाणी जात असून, दुरुस्तीबाबत संशय निर्माण झाला आहे.
शहरात जलवाहिन्यांच्या गळत्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असून, व्हॉल्व आणि जलवाहिनीच्या गळत्यांद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. 24 तास पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी असलेल्या व्हॉल्वद्वारे सतत पाणी वाहत असते. काही वेळा दुरुस्तीचे काम करण्यात येते. मात्र, ही दुरुस्ती तात्पुरतीच ठरत आहे. व्हॉल्वमधून सतत पाणी गेल्याने रस्तादेखील खराब होत आहे. एकीकडे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही तर दुसरीकडे गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. व्हॉल्वच्या दुरुस्तीचे गांभीर्य पाणीपुरवठा मंडळाला नव्हतेच. आता एल ऍण्ड टी कंपनीलाही गांभीर्य नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
काम जुजबी झाल्याची तक्रार
येळ्ळूर रोड, वडगाव परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून व्हॉल्वद्वारे पणी वाया जात आहे. दुरुस्तीसाठी सातत्याने तक्रार केली जाते, पण याची दखल घेतली जात नाही. अलीकडेच पाणीपुरवठा विभागाने व्हॉल्वची दुरुस्ती केली होती. तरीही या व्हॉल्वद्वारे पाणी वाया जात आहे. सदर दुरुस्तीचे काम जुजबी झाल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. दुरुस्तीची कामे व्यवस्थित केली जात नसल्याचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. वाहणाऱया पाण्यामुळे पादचाऱयांना ये-जा करताना अडचण होत आहे. पाणीपुरवठा विभागाने व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.