नवी दिल्ली / वृत्तसंस्था
व्हॉटस् ऍपच्या नव्या खासगीत्व धोरणाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ग्राहकांची व्यक्तीगत माहिती आपल्या अधिकारात उपयोगात आणण्याचे हे धोरण आहे. असा अधिकार कंपनीने स्वतःकडे घेतल्यास ग्राहकांच्या व्यक्तीगत माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. हे धोरण रद्द करण्याचा आदेश कंपनीला देण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
मात्र, दिल्ली उच्च न्यायालयात हा मुद्दा यापूर्वीच उपस्थित झाल्याने आणि त्यावर सुनावणी होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यात आताच लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. परिणामी ही याचिका सादर करून घेतली जाणार नाही, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पष्ट केले.









