बेळगाव
व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व कामांना स्थगिती दिली होती. याबाबत उच्च न्यायालयात शुक्रवार दि. 13 ऑगस्ट रोजी सुनावणी होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून 6 सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयात स्मार्ट सिटीचे वकील हजर झाले आहेत. मात्र मनपा आणि बुडाचे वकील त्या ठिकाणी हजर झाले नसल्याचे वकिलांनी यावेळी सांगितले.
व्हॅक्सिन डेपोमधील वनस्पती, वेगवेगळय़ा प्रकारच्या झाडांची कत्तल राजरोसपणे सुरू होती. व्हॅक्सिन डेपो हा केवळ टिळकवाडीलाच नाही तर बेळगावला सुद्धा ऑक्सिजन देणारा नैसर्गिक स्तोत्र आहे. असे असताना तेथील नैसर्गिक रुप बदलून विकास करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे पर्यावरण प्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या बेकायदेशीर कामांविरोधात राजकुमार टोपण्णावर, किशोरसिंग ठाकुर, प्रशांत पंडित, अनुप जाधव, भरत पाटील, वरुण कारखानीस, सचिन तळवार, विनायक केसरकर, जोशी अश्वथपूर, कौस्तुभ कुलकर्णी, एम. प्रज्वल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
या याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. किरण कुलकर्णी आणि ऍड. सतीश बिरादार हे उच्च न्यायालयात काम पाहत आहेत. व्हॅक्सिन डेपोमध्ये जवळपास 700 हून अधिक वनस्पती आहेत. याचबरोबर 385 च्या आसपास वेगवेगळी झाडे आहेत. याचे नुकसान करून विकास कोणालाच नको आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आता साऱयांचेच लक्ष सुनावणीकडे लागले आहे.









