कोरोना नियमांची पायमल्ली : कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने वृद्ध नागरिकांची फरफट : प्रशासनाबद्दल तीव्र संताप
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता तणावाखाली असून आरोग्य विभाग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. नेमके काय करावे? हेच जिल्हा प्रशासनाला समजत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र कोविड लसचा पुरवठाच होत नसल्यामुळे वृद्धांना, महिलांना ताटकळत तासन्तास थांबावे लागत आहे. बिम्समध्ये सकाळी 8 पासूनच लांबच्यालांब रांगा लागत आहेत. मात्र तेथे थांबूनही लस मिळत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. लसीचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शन्स तुटवडा मग जनतेने जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर आणि काही अधिकाऱयांवर जबाबदारी सोपविल्याचे सांगत आहेत. तर जिल्हय़ातील मंत्री, लोकप्रतिनिधी कोणतेच गांभीर्य घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कोणाकडे साहाय्य मागायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्याबाबतीतील नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून को-व्हॅक्सिन लस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत आरोग्य अधिकाऱयांना विचारले असता ते औषध नियंत्रण अधिकाऱयांकडे बोट करत आहेत. त्यामुळे जिल्हय़ामध्ये नेमके काय चालले आहे? हे कोणालाच समजण्यास तयार नाही. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अधिकाऱयांच्या बैठकी घेऊन ऑक्सिजन पुरवठा करा, लस द्या, असे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
कोरोना रुग्णांमुळे सरकारी हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल्स तुडुंब भरली आहेत. बेड नाहीत म्हणून अनेक रुग्णांना घरी पाठविण्यात येत आहे. तर ऑक्सिजनचा पुरवठा योग्यप्रकारे नसल्याने तिही समस्या निर्माण झाली आहे. बिम्सच्या माध्यमातून काही खासगी हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवठा केला म्हणून सांगितले जात आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्येच अनेकांना ऑक्सिजन मिळत नाही. नेमके खरे काय आणि खोटे काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
बुधवारी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून रांगा लावण्यात आल्या होत्या. मात्र को-व्हॅक्सिन उपलब्ध नाही, कोविशिल्ड उपलब्ध आहे असे सांगितले जात आहे. या रांगेमध्ये यापूर्वी को-व्हॅक्सिन घेतलेले अनेक नागरिक थांबले होते. त्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले आहे. अशीच अवस्था राहिली तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
कोरोनाचे नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र लस घेताना हे नियम पाळणेच कठीण झाले आहे. भर उन्हामध्ये उभे राहून लस घेण्यासाठी अनेक जण तडफडताना दिसत आहेत. खरोखरच आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गरिबांसाठी असलेले सिव्हिल हॉस्पिटल कुचकामी : बैलहोंगलमधील कोरोनाग्रस्ताच्या पालकांची तक्रार
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही म्हणून तक्रारी वाढतच आहेत. बैलहेंगल तालुक्मयातील सानीकोप्प येथील इराप्पा कल्लूर यांनी आपल्या 22 वषीय मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिला ऑक्सिजन देण्यास टाळाटाळ सुरू होती. त्यामुळे अत्यंत भावनावश होऊन इराप्पा कल्लूर यांनी हॉस्पिटल प्रशासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविला.
गरिबांसाठी हे हॉस्पिटल आहे. मात्र गरिबांनाच ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. माझ्या मुलीला मी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी कोरोना झाला म्हणून तिला ऑक्सिजन देण्यात आले. लाखो रुपये बिल करून ऑक्सिजन संपले म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्याची सूचना केली. आम्ही रात्री 1.30 वाजता मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र येथेही ऑक्सिजन नाही म्हणून आम्हाला सांगण्यात आले.
मुलीवर योग्य प्रकारे उपचार करण्यात येत नाहीत. याबाबत त्यांनी अनेकांना सांगितले. डॉक्टर नेहमीच दुर्लक्ष करत आहेत. अशी तक्रारही त्यांनी केली आहे. एकूणच सिव्हिल हॉस्पिटलमधील या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून गरिबांनी जीवन जगणे कठीण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.









