बेंगळूर येथे 50 एकरमध्ये आयआयटी उभे करणारत
प्रतिनिधी / बेळगाव
व्हीटीयूला आयआयटीचा दर्जा देण्याचे विधेयक विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आले. त्याला सभागृहाने पूर्ण क्षमतेने अनुमोदन दिले. मात्र अनेकांनी आपल्या सूचना मांडून व्हीटीयूला जागतिक दर्जा मिळेल, असे काम करा, असे सांगितले. बेंगळूर येथे 50 एकर जागेमध्ये आयआयटी उभे करणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थनारायण यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितली. त्यावर सर्वांनी त्याचे स्वागत करून संमती दर्शविली.
विश्वेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालयामधून दरवषी मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी अभियंते म्हणून बाहेर पडत असतात. देशातील एक महत्त्वाचे आणि दर्जात्मक कॉलेज म्हणून पाहिले जाते. तेव्हा या महाविद्यालयाला आयआयटीचा दर्जा दिल्यास निश्चितच त्याचा कर्नाटकाला मोठा फायदा होईल. मात्र या आयआयटीचे चेअरमन तसेच इतर डायरेक्टर नेमताना जी नियमावली आहे ती चुकीची असून त्या नियमावलीमध्ये बदल करावा, अशी मागणी विधानपरिषद सदस्य मरितीप्पेगौडा यांनी केली.
या आयआयटीसाठी 50 कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थनारायण यांनी दिली. मात्र 50 कोटींमध्ये आयआयटी उभे करणे कठीण असून त्यासाठी किमान 100 कोटींचा तरी निधी राखीव ठेवावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी केली आहे. यावेळी या विद्यापीठामध्ये आयआयटीसाठी कर्नाटकामधीलच विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, असेदेखील त्यांनी सांगितले.
उपकुलगुरु यांना 67 वर्षांपर्यंत सेवा बजावण्याची मुभा दिली गेली आहे. तेव्हा ती 65 वर्षे करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. चेअरपर्सनला 4 वर्षे तर संचालकांना 3 वर्षे यामध्येदेखील तफावत आहे. सर्वांनाच 4 वर्षे त्या समितीवर राहण्याचा अधिकार द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे बेंगळूर येथील ज्ञान भारती कॅम्पसमध्ये आयआयटी कॉलेजची उभारणी करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे.









