वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारतात होणाऱया 2021 टी-20 विश्वचषक व 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी व्हिसा मिळणार का, याची कोण चिंता लागलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्यानंतर बीसीसीआयने देखील त्याला तोडीस तोड, ठोस उत्तर दिले आहे. या दोन्ही विश्वचषक स्पर्धेसाठी व्हिसा देण्यात कोणतीही अडचण आणणार नाही, अशी लेखी हमी बीसीसीआयने द्यावी, अशी मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली. त्याला उत्तर देताना, व्हिसाची लेखी हमी दिली तर पाकिस्तान दहशतवाद थांबवण्याची हमी देणार का, असा प्रतिप्रश्न बीसीसीआयने केला आहे.
आयसीसीच्या नियमांप्रमाणे खेळ, स्पर्धा, मालिका चालवताना त्या एकंदरीत प्रक्रियेत प्रशासकीय हस्तक्षेप असू नये. हेच क्रिकेट मंडळांना देखील लागू होते की त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिनीत हस्तक्षेप करु नये. जर पाकिस्तानला व्हिसाची लेखी हमी हवी असेल तर त्यांनीही दहशतवाद थांबवण्याची लेखी हमी द्यावी, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना नमूद केले.
‘पुलावामासारख्या चुकींच्या घटनांची पुनरावृत्ती पाकिस्तानचे सरकार करणार नाही, अशी लेखी हमी पाकिस्तान क्रिकेट मंडळ देऊ शकते का, हा आमचा प्रश्न आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, सीमेवर दहशतवादी कारवाया होणार नाहीत, असे ते लिहून देऊ शकतात का’. असा सवाल सदर प्रवक्त्याने उपस्थित केला.
‘खेळाच्या व्यवस्थापनात प्रशासनाने हस्तक्षेप करु नये आणि प्रशासनाच्या व्यवस्थापनान क्रीडा मंडळाने लक्ष घालू नये, या एकमेकांशी पूरक बाबी आहेत. यामुळे, पाकिस्तानने याची गंभीर दखल घ्यावी आणि आयसीसीमध्ये भारताच्या हिताविरोधी कार्यरत व्यक्तीप्रमाणे वर्तणूक ठेवणे बंद करावे. भारत हा समतोल देश आहे आणि समतोल साधतच वाटचाल सुरु आहे’, असे या प्रवक्त्याने पुढे स्पष्ट केले.
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे सीईओ वासिम खान यांनी भारतातील 2021 व 2023 आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने व्हिसाची लेखी हमी द्यावी, अशी मागणी केली होती.
क्रिकेट बाझ या यूटय़ूब चॅनेलशी वासिम खान बोलत होते. त्यावर बीसीसीआयने आपली बाजू मांडली आहे.
प्रतिकूल उदाहरणाचा दाखला
अलीकडील कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांकरिता भारताने पाकिस्तानी संघांना व्हिसा मंजूर केलेला नाही, याकडे वासिम खान यांनी त्यावेळी लक्ष वेधले होते.