ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या व्हाइट हाऊस कार्यालयातील एका अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाली आहे. माइक पेन्स यांचे प्रेस सचिव कॅटी मिलर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स गेल्या काही दिवसांपासून संबंधित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात नाहीत. मात्र, व्हाईट हाऊसमधील ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली होती, याची माहिती घेण्यात येत आहे. व्हाइट हाऊस परिसरात प्रवेश करण्यासाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉक्टरांची टीम आणि सीपेट सर्व्हिस एजंट प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची तपासणी करूनच त्यांना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश देत आहेत. तरी देखील एक अधिकारीच कोरोना संक्रमित आढळल्याने व्हाइट हाऊस परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.
जगभरात वेगाने पसरणाऱया कोरोना विषाणूने अमेरिकेत आतापर्यंत 225 जणांचा बळी घेतला आहे. तर 16 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.