देशातील पहिले व्हर्च्युअल स्कूल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील पहिल्या व्हर्च्युअल स्कूलचा बुधवारी शुभारंभ केला आहे. देशभरातील विद्यार्थी या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. ‘दिल्ली मॉडेल व्हर्च्युअल स्कूल’मधील प्रवेशप्रक्रिया बुधवारी सुरू झाली आहे. ही शाळा नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
देशभरातील विद्यार्थ्यासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यात नीट, सीयूईटी तसेच जेईईच्या परीक्षांची तयारी करविण्यासह कौशल्य आधारित अन्य प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ‘व्हर्च्युअल स्कूल’ शिक्षणाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार असल्याचे उद्गार केजरीवाल यांनी काढले आहेत.
शाळा लांब असल्याने किंवा अन्य कारणांमुळे शाळेत जाऊ न शकणारी अनेक मुलेमुली आहेत. अनेक आईवडिल स्वतःच्या मुलींना केवळ त्यांना बाहेर पाठविण्याची इच्छा नसल्याने शिकवू पाहत नाहीत. आम्ही हे व्हर्च्युअल स्कूल सुरू करत अशा मुलामुलींना शिक्षण मिळवून देणार आहोत. कोरोना महामारीदरम्यान आवश्यक ठरलेल्या ऑनलाइन वर्गांपासून ही शाळा प्रेरित आहे. या शाळेतील वर्ग ऑनलाइन असणार आहेत. तसेच रिकॉर्ड करण्यात आलेली व्याख्यानेही ऑनलाइन व्यासपीठांवर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.









