13 जानेवारीपर्यंत विनाविलंब शुल्कासह भरण्यास मुदत
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ 2021-22 ऑक्टोबर-नोव्हेंबरचे परीक्षा अर्ज भरण्यास फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विनाविलंब शुल्कासह 13 जानेवारीपर्यंत पदवी व पदव्युत्तरचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरावयाचे आहेत. तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.
विद्यापीठ हिवाळी व्यावसायिक परीक्षेचा अर्ज विद्यार्थ्यांनी 13 जानेवारीपर्यंत भरावयाचा आहे. तर महाविद्यालय व अधिविभागांनी 14 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज विनाविलंब शुल्कासह मंजुर करावयाचे आहेत. महाविद्यालय व अधिविभागांनी 15 जानेवारीपर्यंत अर्ज विद्यापीठातील परीक्षा विभागात सादर करावयाचे आहेत. यामध्ये शिक्षणशास्त्र, अभियांभिकी, औषधनिर्माणशास्त्र, टेक्स्टाईल्स, बी-टेक, विधी, एम. बी. ए., वायसीएसआरडीकडील अभ्यासक्रम व इतर सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम व थेट व्दितीय वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता परीक्षा अर्ज भरण्यासाठीच्या सुधारीत तारखा विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्याच्या सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक पळसे यांनी परिपत्रकाव्दारे महाविद्यालयांना दिल्या आहेत.