चित्रपटगृहे बंदच राहणार : ‘अनलॉक-3’संबंधी केंद्र सरकारकडून नियमावली जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘अनलॉक-3’साठी केंद्र सरकारकडून बुधवारी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार रात्रीच्यावेळी फिरण्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. सोबतच योगा इन्स्टिटय़ूट आणि व्यायामशाळा 5 ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापित कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
31 जुलै रोजी अनलॉक-2 समाप्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने कंटनमेंट क्षेत्र वगळून अन्य भागातील बहुतांश नियम आणखी शिथिल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती विचारात घेऊन स्थानिक परिस्थितीनुरुप नियमावलीत सुधारणा करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
31 जुलै रोजी अनलॉक-2 संपणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून नियमावलीत बदल होणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर केंद्र सरकारने सलग अडीच महिने कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतर शिथिलता देण्यास सुरूवात केली होती. पहिल्या अनलॉकमध्येच केंद्र सरकारने बऱयाच बाबी शिथिल केल्या असल्या तरी राज्य सरकारांनी सावधगिरीसाठी कंटेनमेंट क्षेत्रांमध्ये अनेक निर्बंध कायम ठेवले होते. निर्बंध असूनही कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे अजून काही दिवस नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
नियमांच्या चौकटीत स्वातंत्र्यदिन…
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत असल्याने पुढील महिन्यात होणाऱया स्वातंत्र्य दिनासंबंधीही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व नियम पाळून स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत. ध्वजारोहणावेळी गर्दी टाळण्याची सूचना केली आहे. कोरोनामुळे यंदा स्वातंत्र्याचा सण साजरा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, असा सल्ला देण्यात आला आहे. सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरही करावी लागणार आहे. नवतंत्रज्ञानाचा आधार घेत ध्वजवंदन सोहळा साजरा करण्याचे निर्देश देशवासियांना देण्यात आले आहेत.









