ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावादानंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला असतानाच अखिल भारतीय व्यापारी महासंघाने 500 चिनी उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लडाख सीमेवर मागील महिनाभरापासून भारत आणि चिनी सैन्यांत संघर्ष सुरु आहे. दरम्यान, चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यांमध्ये सोमवारी रात्री आणि मंगळवारी झालेल्या हल्ल्यात 20 जवान हुतात्मा झाले. तर चीनचे 43 सैनिक ठार आणि गंभीर जखमी झाले आहेत. चीनच्या या हल्ल्याला व्यापारातून उत्तर देण्याचा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कैट) घेतला आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कैटने 500 चिनी उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्या वस्तूंची यादीही तयार केली आहे.
भरतीया म्हणाले, भारत चीनच्या 500 प्रकारच्या जवळपास 3000 वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहे. बहिष्कार टाकण्यात येणाऱ्या वस्तू भारतातही तयार केल्या जाऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नाही. या वस्तू भारतात तयार झाल्यास चीनवर अवलंबून रहावे लागणार नाही. भारत दरवर्षी 5.25 लाख कोटींची आयात चीनकडून करतो. ते आयातीचे प्रमाण कमी करून चीनला धडा शिकवणे आणि भारतात या उद्योगांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.
कापड (टेक्सटाइल), बांधकामासाठी लागणार साहित्य, फुटवेअर्स, ज्वेलरी, स्टेशनरी साहित्य, कागद, घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फर्निचर, लाईटिंग, हॅन्ड बॅग, कॉस्मेटिक, भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू, लहान मुलांची खेळणी, दैनंदिन कामात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फर्निशिंग फॅब्रिक, स्वयंपाक घरात वापरात येणारे सामान, ऑटो पाटर्स, चष्मे, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल्स वस्तू अशा 500 प्रकारच्या 3000 वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, असेही भरतीया यांनी सांगितले.









