पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील निसर्ग आणि पर्यावरणाचे खरोखरच जतन व्हावे असे वाटत असेल तर राखीव व्याघ्र क्षेत्र निर्माण करणे हाच त्यासाठी एकमेव मार्ग आहे, असे मत प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. गोव्यासारख्या लहान राज्याच्या अस्तित्वासाठी वने संरक्षित राहणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात आम्हाला पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
वने संरक्षित राहिली तरच मातीचे रक्षण होईल, संबंधित परिसराचे अस्तित्व टिकून राहील व तेथील स्थानिकांचे जीवन समृद्ध राहील, असे ते पुढे म्हणाले. व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बाबतीत काही लोकांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. त्यातून विविध प्रकारे अपप्रचार फैलावण्यात येत आहेत. परिणामी या व्याघ्र क्षेत्राच्या लाभ-फायद्यांची खरी माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून किंवा केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार आहे? एखाद्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे लागल्यास त्यासाठी प्रत्येकी सुमारे 13 लाख ऊपयांची तरतूद आहे. त्याशिवाय जमिनी गमवाव्या लागल्यास त्याचीही भरपाई देण्याची तरतूद आहे, यासारख्या गोष्टींचेही त्यांना ज्ञान नाही. हे सर्व प्रकार गैरसमजामुळे होत आहेत, असे केरकर म्हणाले.
आपल्या अभ्यासानुसार म्हादईपासून खोतीगावपर्यंतचा संपूर्ण परिसर हा व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा केवळ 234 चौ. कि. क्षेत्रफळ हे व्याघ्र क्षेत्र म्हणून राखीव करण्यात आले आहे. उर्वरित परिसर ‘बफर झोन’ म्हणून संरक्षित करण्यात आला आहे. या बफर झोनमध्ये समावेश जमिनीत लोकांना शेती, बागायती यासारखे दैनंदिन व्यवहार करता येतात. त्यामुळे व्याघ्र क्षेत्रासंबंधी लोकांनी गैरसमज करून घेऊ नयेत.
म्हादई आणि नेत्रावळी या परिसरात सुमारे 18 खनिज खाणी आहेत. त्यामध्ये हितसंबंध गुंतलेल्यांच्या तसेच प्रचंड मोठ्या जमिनी खरेदी करून हॉटेलसारखे प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असलेल्यांच्या दबावाला बळी पडून सरकार व्याघ्र क्षेत्र राखीव करण्यास चालढकल करत आहे. यापूर्वी अशाच प्रकाराचा अनुभव काणकोण तालुक्यातील लोकांनी घेतला आहे. तेथील ‘रावण डोंगर’ पोखरल्यामुळे त्याचे अस्तित्व दुर्बल होऊन महापूर आला. या स्मृती ताज्या आहेत. अशावेळी खाणी पुन्हा सुरू झाल्यास आमचेही अस्तित्व दुर्बल होण्याची शक्यता आहे, असे केरकर यांनी सांगितले.









