मुकेश अंबानींचा ’जिओमार्ट’ मैदानात उतरल्यामुळे भारतातील ’ई-कॉमर्स’ क्षेत्रातील चुरस आणखी रंगतदार झालेली असून सध्या लघू आणि मध्यम उद्योग तसंच किराणा व्यापारी यांना आपल्याकडे खेचण्याचीही जोरदार स्पर्धा लागल्याचं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर ’फ्लपिकार्ट’नं आपली पालक कंपनी ’वॉलमार्ट’चा देशातील ’होलसेल’ व्यवसाय ताब्यात घेतलाय…काय आहे ही घडामोड त्यावर टाकलेला सविस्तर दृष्टिक्षेप…
‘फ्लिपकार्ट ग्रुप’नं त्यांच्या भारतातील व्यवसायाचं अधिग्रहण करणारी अमेरिकेच्या भूमीवरील व विश्वातील सर्वांत मोठी ‘रिटेल’ कंपनी ‘वॉलमार्ट’चा आपल्या देशातील सातत्यानं तोटा सहन करणारा ‘होलसेल कॅश-अँड-कॅरी’ व्यवसाय खिशात घालण्याचा निर्णय घेतलाय…भारतीय आस्थापन ‘फ्लिपकार्ट होलसेल’ या नावाच्या साहाय्यानं ‘बिझनेस-टू-बिझनेस’ (बीटूबी) मोहिमेला प्रारंभ करण्यास सज्ज झालंय…नवीन कंपनी स्वतंत्र ‘रिटेलर्स’ अन् लहान नि मध्यम उद्योगांना साहाय्य करेल. शिवाय ‘फ्लिपकार्ट होलसेल’चा ‘किराणा स्टोअर्स’ना सुद्धा आधार मिळेल…‘रिलायन्स इंडस्ट्रीज’नं ‘जिओमार्ट’च्या साहाय्यानं ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रात नेटानं प्रवेश केलाय आणि त्यामुळं दडपण वाढलंय ते ‘वॉलमार्ट’वरचं. विश्वविख्यात अमेरिकी आस्थापनानं नवीन डावपेचाला जन्म दिलाय तो या पार्श्वभूमीवर. त्याखेरीज ‘फ्लिपकार्ट होलसेल’ला तोंड द्यावं लागेल ते दिग्गज ‘प्लेयर्स’ ‘मेट्रो कॅश-अँड-कॅरी’ व ‘ऍमेझॉन’च्या ‘उडान’ला (बीटूबी)…
‘फ्लिपकार्ट होलसेल’च्य्या प्रवासाला सुरुवात होईल ती ऑगस्ट महिन्यात. कंपनीनं लक्ष केंद्रीत करण्याचा प्रामुख्यानं निर्णय घेतलाय तो ‘किराणा माल’ नि ‘फॅशन्स’वर…‘फ्लिपकार्ट’मधील अनुभवी व्यक्ती आदर्श मेनन यांच्याकडे आस्थापनाचं नेतृत्व सोपविण्यात आलंय. ‘वॉलमार्ट इंडिया’चे ‘सीईओ’ समीर अगरवाल यांना येऊ घातलेल्या दिवसांत संधी मिळेल ती जागतिक व्यासपीठावर काम करण्याची…‘वॉलमार्ट इंडिया’चs भारतात सध्या एकूण 28 ‘बेस्ट प्राईस स्टोअर्स’ असून तेथील कर्मचाऱयांना ‘फ्लिपकार्ट होलसेल’मध्ये कर्तृत्वाचं दर्शन घडविण्याची संधी मिळेल. या अधिग्रहणामुळं कंपनीची ताकद निश्चित वाढणार, कारण त्यांना भक्कम आर्थिक साहाय्य मिळेल ते ‘वॉलमार्ट’चं. त्या जोरावर आस्थापनाला स्वतंत्र ‘रिटेलर्स’ व किराणा मालाचे व्यापारी यांना धडक देणं शक्य होईल…
‘फ्लिपकार्ट ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी आत्मविश्वासानं सांगितलंय की, कंपनीला भविष्यात ‘फ्लिपकार्ट होलसेल’मुळं ‘तंत्रज्ञान’, ‘लॉजिस्टिक्स’, ‘फायनान्स’ आणि ‘लहान उद्योग’ यांच्यावर लक्ष केंद्रीत करणं शक्य होईल…‘फ्लिपकार्ट समूहा’नं ‘बेस्ट प्राईस बँड’चा गाशा न गुंडाळण्याचं देखील ठरविलंय…अन्य एका घडामोडीनुसार, अजस्त्र ‘वॉलमार्ट’नं ‘फ्लिपकार्ट ग्रुप’मध्ये पुन्हा एकदा तब्बल 1.2 अब्ज डॉलर्स ओतण्याचा निर्णय घेतलाय. दोन वर्षांपूर्वी ‘वॉलमार्ट’नं 16 अब्ज डॉलर्सच्या साहाय्यानं ‘फ्लिपकार्ट’च्या 77 टक्के हिश्श्याला खिशात टाकलं होतं…
‘वॉलमार्ट’ आपल्या भारतातील कंपनीत 2020-21 आर्थिक वर्षात गुंतवणूक करणार ती दोन टप्प्यांत. ‘फ्लिपकार्ट’चं मूल्य त्यानंतर झेप घेणार 24.9 अब्ज डॉलर्सवर. अमेरिकी आस्थापनानं जेव्हा 2018 साली अधिग्रहण केलं तेव्हा ‘फ्लिपकार्ट’चं मूल्य होतं 22 अब्ज डॉलस&. नवीन गुंतवणुकीनंतर ‘वॉलमार्ट’चं ‘शेअरहोल्डिंग’ ओलांडणार तब्बल 80 टक्क्यांचा टप्पा…दोन्ही कंपन्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटलंय की, सध्याचे काही ‘शेअरहोल्डर्स’ देखील गुंतवणुकीत सहभागी झालेत…परंतु त्यांची नावं मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. महत्त्वाच्या दोन ‘शेअर होल्डर्स’मध्ये समावेश आहे तो चीनच्या ‘टेनसेंट’चा व ‘न्यूयॉर्क’च्या ‘टाइगर ग्लोबल’चा. दोन्ही आस्थापनांच्या खिशात आहे प्रत्येकी 5 टक्के हिस्सा. त्याखेरीज ‘मायक्रोसॉफ्ट’ नि सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनीही ‘समभाग’ तिजोरीत भरलेत…
‘फ्लिपकार्ट’ची नोंदणी करण्यात आलीय ती सिंगापूरमध्यs. ‘वॉलमार्ट’ गुंतवणुकीचा वापर करणार तो ‘फ्लिपकार्ट’च्या ‘ऑनलाईन रिटेल बिझनेस’साठी. ‘फ्लिपकार्ट’च्या मुठीत ‘फॅशन पोर्टल’ ‘मिंत्रा’सुद्धा असून ‘मिंत्रा’ची मार्केटवर वर्चस्व मिळविण्यासाठी जबरदस्त झुंज चाललीय ती अमेरिकेच्या दिग्गज ‘ऍमेझॉन’शी…समूहाच्या ‘पेमेंट्स युनिट’ ‘फोन पे’नं स्वतंत्ररीत्या भांडवल उभारण्याचा निर्णय घेतलाय. ‘फोन पे’नं स्वप्न पाहिलंय ते किमान 8 अब्ज डॉलर्सच्या मूल्याला स्पर्श करण्याचं. ‘युनिट’ला ‘टेनसेंट’सारख्या सध्याच्या गुंतवणूकदारांकडून अपेक्षा आहे ती सुमारे 1 अब्ज डॉलर्स मिळण्याची…‘फ्लिपकार्टनं सातत्यानं नाविन्यपूर्ण गोष्टींवर भर देण्याचं, त्यांच्या साहाय्यानं वृद्धीची नेंद करण्याचं ठरविलंय. आम्हाला देशातील लाखो ग्राहक, व्यापारी, विक्रेते आणि लहान उद्योग यांना सुबत्तेचं दर्शन घडवायचंय. आमची इच्छा आहे ती भारताच्या ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’चा हिस्सा बनण्याची’, ‘वॉलमार्ट’च्या अध्यक्षा नि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युडिथ मॅककिना सांगतात…
या क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार, ‘महामारी’चा लाभ मिळालाय तो आपल्या देशातील ‘ई-कॉमर्स’च्या वृद्धीला. या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या 12 ते 18 महिन्यांत जोरदार दर्शन घडेल ते ‘वॉलमार्ट’, ‘ऍमेझॉन इंडिया’ आणि ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा ‘जिओमार्ट’ यांच्यातील जीवघेण्या संघर्षाचं. ‘वॉलमार्ट’ बहुतेक भारतातील वेगवेगळय़ा केंद्रांत भांडवल ओतणार ते ग्राहकांच्या संख्येनुसार. त्याखेरीज भविष्यात कंपन्यांचा भर असेल तो ‘ग्रोसरी व फूड रिटेल’, ‘डिजिटायजिंग स्मॉल सेलर्स’ अन् ‘व्हिडीओ’ नि ‘सोशल कॉमर्स’संबंधीचे विविध प्रयोग यांच्यावर…आस्थापनांनी सध्या फार मोठय़ा प्रमाणात लक्ष केंद्रीत केलंय ते किराणा मालावर. यापूर्वी असं घडलं नव्हतं. पण ‘कोव्हिड-19’नंतर सारं वातावरणच बदललंय…सरकारनं कंपन्यांच्या ‘फूड रिटेल लाइसेन्स’ला सुरुवातीला मान्यता दिलेली नसली, तरी आता मात्र प्रशासनानं चूक सुधारलीय आणि त्यामुळं या ‘सेगमेंट’मध्ये गुंतवणूक खात्रीनं वाढणार !
‘वॉलमार्ट’ची ‘फ्लिपकार्ट’मध्ये गुंतवणूक…
- 2018 साली अधिग्रहण केल्यानंतर ‘वॉलमार्ट’नं ‘फ्लिपकार्ट’मध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती…
- ‘वॉलमार्ट’नं त्यानंतर 14 अब्ज डॉलर्सचा वापर प्रवर्तकांचे व तत्कालीन गुंतवणूकदारांचे समभाग खरेदी करण्यासाठी केला…
- अमेरिकी कंपनीनं खिशात घातलेल्या भारतीय आस्थापनात अजूनपर्यंत एकूण 17.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय…
- ‘फ्लिपकार्ट’नं 2018-19 मध्ये 42 हजार 879 कोटी रुपयांचा (5.7 अब्ज डॉलर्स) महसूल मिळविला…त्या आर्थिक वर्षात ‘फ्लिपकार्ट’नं 17 हजार 232 कोटी रुपयांचा तोटा सुद्धा सहन केला…
- ‘फ्लिपकार्ट’नं ‘स्ट्रटेजिक’ गुंतवणूक केलीय ती ‘निंजाकार्ट’ (फळं व भाज्यांची ‘सप्लाय चेन’) नि ‘शॅडोफॅक्स’ (हायपर लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म) या ‘स्टार्टअप्स’मध्ये..
– राजू प्रभू