इतके अर्ज दाखल झाल्यामुळे शहरात चर्चेचा विषय
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी तब्बल 434 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणुकीच्या रिंगणात 519 अर्ज आहेत. मात्र छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे. वॉर्ड क्र. 4 मध्ये तब्बल 23 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. एकाच वॉर्डमध्ये इतक्मया उमेदवारांची इच्छा का? असा प्रश्न शहरवासियांसमोर निर्माण झाला आहे.
महापालिका वॉर्ड पुनर्रचनेनंतर अनेक वॉर्डांची तोडफोड करण्यात आली. वॉर्ड क्र. 4 ची निर्मिती करताना चार वॉर्ड फोडून एक वॉर्ड निर्माण करण्यात आला आहे. जुना वॉर्ड क्र. 31, 32 आणि 34 अशा तीन वॉर्डमधील विविध गल्ल्यांचा समावेश नव्या वॉर्ड क्र. 4 मध्ये करण्यात आला आहे. रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, अनंतशयन गल्ली, मारुती गल्ली, महादेव गल्ली, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, रविवारपेठचा काही भाग, भातकांडे गल्ली, मेणसे गल्लीचा काही भाग, संपूर्ण गणपत गल्ली, निम्मे खडेबाजार, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, बुरूड गल्ली, नार्वेकर गल्लीचा काही भाग, समादेवी गल्लीची एक बाजू, मण्णूरकर गल्ली, रामदेव गल्लीची एक बाजू, मार्केट परिसर असा 20 गल्ल्यांचा परिसर या वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मुख्यतः या परिसरात बेळगावची बाजारपेठ पसरली आहे. विविध व्यवसाय आणि मोठी शोरूम्स आणि असंख्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश या वॉर्डमधून येतो. हा परिसर मोठा असला तरी या वॉर्डची मतदारसंख्या 8 हजार 782 आहे.
नव्याने निर्माण झालेल्या वॉर्ड क्र. 4 मधून असंख्य इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक गल्लीमधून एक या प्रमाणे 23 उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारपर्यंत दाखल झाले आहेत. 58 वॉर्डांमध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज या वॉर्डमधून दाखल झाले आहेत. त्यामुळे इतके अर्ज दाखल झाल्यामुळे शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
काही वॉर्डमध्ये 15 ते 18 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पण या वॉर्डमधून इतके अर्ज कसे? याबाबत चर्चेला ऊत आला आहे. वॉर्डमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या काही माजी नगरसेवकांनी माघार घेतली आहे. तरीदेखील ही संख्या 23 पर्यंत पोहोचली आहे. रहिवासीपेक्षा व्यावसायिक आस्थापने जास्त असलेल्या वॉर्डमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे या वॉर्डमधून कोण निवडून येणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.









