रिपाइंचे कोकण विभागीय संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ यांचा इशारा, अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील भडगाव येथे बौद्धवाडीची वस्ती असल्याचे भासवत बौद्ध समाजातील काही लोकांच्या बनावट सह्या घेवून स्वत: च्या वैयक्तिक स्वार्थासाठी विशेष घटक योजनेतून १९ लाखांचा निधी खर्चुन पुलाची उभारणी करणाऱ्या मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बौद्ध समाजबांधवांची फसवणूकच केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले गट ) कोकण विभागीय संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी कारवाईसाठी १५ दिवसांची डेडलाईन देत अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
भडगाव येथे पत्नीच्या नावे असलेल्या चार फ्लॅटकडे जाण्यासाठी पदाचा दुरूपयोग करत पुलाची उभारणी करताना बौद्ध समाजातील रहिवाश्यांच्या बोगस सह्या घेवून विशेष घटक योजनेतून १९ लाखाचा फंड लाटल्याचा आरोप यापूर्वीच माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेला असतानाच त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही उडी घेतली आहे. भरणे येथील हॉटेल बिसू येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोकण विभागीय संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी वैभव खेडेकर यांच्यावर चौफेर आरोप केले.
ते म्हणाले, नगराध्यक्ष खेडेकर यांनी पदाचा गैरवापर करत बौद्ध समाजातील कुठल्याही व्यक्तीला विश्वासात न घेताच बनावट सह्या घेवून स्वत: च्या मालमत्तांकडे जाण्यासाठी पुलाची उभारणी केली. भडगाव येथे बौद्धवाडीची वस्ती नसतानाही या वस्तीसाठीच पुलाची मागणी करणारे परवानगी पत्र प्रशासनाकडे देण्यात आले होते. पदाचा दुरूपयोग करून विशेष घटक योजनेतून पुलासाठी १ ९ लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेत पुलाची उभारणी केली आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठीच हा पूल बांधण्यात आला असून बौद्ध समाजबांधवांची घोर फसवणूकच करण्यात आली आहे. या पुलासाठी खर्च करण्यात आलेला निधी दुपटीने तातडीने वर्ग करण्याची मागणी करत वैभव खेडेकर यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हायला हवी. वैभव खेडेकरांसह अन्य अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी १५ दिवसांची डेडलाईन देत कारवाई न झाल्यास उग्रआंदोलन छेडणार असल्याचेही स्पष्ट केले. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादा मचडे, तालुकाध्यक्ष रजनीकांत जाधव, आर. पी. येलवे, सुरेंद्र तांबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









