वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मागे
गुरुवारी सायंकाळपासून पुन्हा आरोग्य सेवेस सुरुवात
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
तात्पुरत्या सेवेतील डॉक्टरांना कायम करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. गुरुवारी सायंकाळपासून त्यांनी पुन्हा आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई येथे गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संपात सामील असलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांना सेवेत कायम करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आमच्यावर विश्वास ठेऊन थोडा वेळ द्या. नक्कीच तुमच्या अपेक्षापेक्षा कमी वेळेत सेवेत कायम करण्याचे काम करु, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. या बैठकीस छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. कुंदन कांबळे, डॉ. प्रज्ञेश पानशेवडीकर, डॉ. संचीत खरे, डॉ. गजाजनन अल्पेवाड व राज्यातील १८ शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील तात्पुरत्या सेवेतील डॉक्टर उपस्थित होते.









