137 दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेच नाहीत : जवळपास 19 हजार कोटीचा झाला तोटा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसात देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर पुन्हा आता खनिज तेलाचे दर वाढवले जात आहेत. यामध्ये भारतामधील आघाडीवरच्या इंधन कंपन्या आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना नोव्हेंबर ते मार्चपर्यंत जवळपास 19 हजार कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले असल्याची माहिती आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वधारत असतानाही पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर ठेवले गेल्याने हा तोटा कंपन्यांना झेलावा लागला. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमती साधारण 80 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्या होत्या. त्या आता वधारुन 110 डॉलरच्या घरात पोहोचल्या असल्याची माहिती मूडीज इन्वेस्टर सर्व्हिस यांच्या अहवालामधून सांगितले आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 च्या दरम्यान पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता. तसेच अहवालातील माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती वधारल्याने कंपन्यांना जवळपास 1900 रुपये प्रति बॅरेल नुकसान सहन करावे लागले आहे. सध्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लिटर वाढ केली आहे.
हळू-हळू किमती वधारणार
रेटिंग एजन्सीच्या अंदाजानुसार आयओसीला जवळपास 1 ते 1.1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे, बीपीसीएल व एचपीसीएलला जवळपास 550 ते 650 दशलक्ष डॉलर इतके नुकसान झाल्याचे समजते. रिफायनरीला नुकसानीपासून वाचवण्यासाठी किमती वाढविण्यासाठी मान्यता सरकारकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. या पद्धतीने इंधनाच्या किमती हळू-हळू वाढत जाण्याचा अंदाजही रेटिंग कंपन्यांचा आहे.
कशा निश्चित होतात किमती?
जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलच्या किमती निश्चित करत होते. प्रत्येक 15 दिवसाला यामध्ये बदल केला जात होता. 26 जून 2010 नंतर मात्र सरकारने पेट्रोलच्या किमती निश्चित करण्याचे काम तेल कंपन्यांकडे सोपविले. या प्रकारे ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलच्या किमती सरकार ठरवत होते. परंतू 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे दिले आहे. सध्या तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, कर, पेट्रोल व डिझेलच्या वितरणाचा खर्च व अन्य बाबी लक्षात घेत दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमती निश्चित करत आहेत.









