निमसोड/प्रतिनिधी
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेकजणांनी मुंबई-पुणे शहरासह परराज्यातून मुळगांवी धाव घेतली आहे. यापैकी बहुतांशी लोक सधन आहेत. हे सधन लोक गांवी आल्यानंतर शाळेत अथवा हॉस्पिटलमध्ये संस्थात्मक विलगीकरण न करता स्वत:च्या घरात राहणेच पसंत करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत अश्या लोकांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने अनेक ठिकाणी ग्रामदक्षता समित्या हतबल आहेत. मात्र या परस्थितीला अपवाद ठरले आहेत सुर्याचीवाडी (ता. खटाव) येथील जाधव कुटुंबीय. या कुटुंबाने आपल्या घरासह आजुबाजुला संसर्ग प्रादुर्भावाचा त्रास होवू नये म्हणून स्वत:हून शाळेत राहणे पसंद केले आहे. चौदा दिवसांच्या कालावधीत त्यांनी शाळेची स्वच्छता, वृक्षारोपन असे उपक्रम राबविण्याबरोबर देणगी रुपाने काही वस्तु शाळेस भेट दिल्या आहेत. त्यांनी केलेला वेळेचा सदउपयोग व सामाजिक बांधिलकीचे परिसरात कौतुक होत आहे.
कालानुरूप वाट्याला आलेल्या परिस्थितीचा कांगावा न करता वेळेचा सदुपयोग, स्वतः बरोबर समाज हिताचा विचार करून जाधव कुटुंबियानी केलेले काम समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श बाहेर गावाहून येणार्या प्रत्येक कुटुंबियांनी घेण्याची गरज. रंजना सानप, शिक्षीका, सुर्याचीवाडी