वार्ताहर / बागायत:
वेरली-धनगरवाडी सडा येथील मेंढपाळ धाकू जानू खरात यांच्या चरावयास सोडलेल्या बकऱयांवर या परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबटय़ाने हल्ला करून कळपातील तीन बकऱयांना ठार केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी वेरली सडा परिसरातील केळय़ाचा व्हाळ भागात घडली.
मेंढपाळ धाकू खरात हे कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांची आई जयश्री खरात यांनी आपल्या बकऱयांना केळय़ाचा व्हाळ परिसरात चरावयास नेले. शुक्रवारी सायंकाळी जयश्री या बकऱयांना घेऊन जात असता दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्यासमक्षच कळपातील बकऱयांवर हल्ला केला. यावेळी जयश्री या घाबरून बेशुद्ध पडल्या. यावेळी बिबटय़ाने दोन बकऱयांना जाग्यावरच ठार केले. एका बकरीला पकडून बिबटय़ा जंगलमय भागात पळला. काहीवेळाने जयश्री या शुद्धी आल्यावर त्यांना आपल्या कळपातील तीन बकऱया नाहीशा झाल्याचे समजले. यावेळी ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत दोन मोठय़ा बकऱयांचे मृतदेह सापडले, तर एक बकरी बिबटय़ाने जंगलात नेऊन फस्त केली.
याबाबत धाकू खरात यांनी वेरली पोलीस पाटील प्रमोद कदम यांना कळविल्यावर पोलीस पाटील प्रमोद परब यांनी मालवण वनपाल कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. तालुका वनपाल रामचंद्र मडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सारीक फकीर, वनकर्मचारी अनिल परब, पोलीस पाटील परब यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनाम्यात 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.









