प्रतिनिधी / वास्को
मुरगाव पालिका कर्मचाऱयांनी काल सोमवारपासून वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ काम बंद केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित होत असून जुलै महिन्याचे वेतन शुक्रवारपर्यंत द्यावे अन्यथा काम बंद ठेवणार असल्याची नोटीस कामगार संघटनेने बजावली होती. त्यानुसार सोमवारी कामगारांनी काम बंद ठेवल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झालेला आहे. संध्याकाळपर्यंत हा प्रश्न सुटला नव्हता.
ठरल्याप्रमाणे मुरगावच्या पालिका कामगारांनी स्वच्छतेच्या कामांना हात घातला नाही. त्यांना पाठींबा देण्यासाठी पालिकेच्या कार्यालयीन कर्मचाऱयानीही काम बंद ठेवले. सर्व कामगार शहरातील पालिकेच्या गॅरेजजवळ एकत्र आले होते. तेथेच त्यांनी ठाण मांडले. कार्यालयीन वेळेत या कामगारांच्या प्रतिनिधीनी मुख्याधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वेतनाचा प्रश्न मांडला. वेतनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी कामगारांना दिले. मात्र, वेतन नक्की कधी देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे पालिका कामगारांनी काम बंद संप चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी संध्याकाळपर्यंत प्रयत्न केला. मात्र, संप मागे घेण्याबाबत कामगारांनी सहकार्य केले नाही. कामगार वेतन मिळेपर्यंत संप मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे नगरपालिकेसमोर पेच निर्माण झालेला आहे.
दर महिन्याला उपस्थित होतो कामगारांच्या वेतनाचा प्रश्न
वेतनाच्या प्रश्नासंबंधी कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार गेलेल्या काही महिन्यांपासून वेतनाचा प्रश्न उपस्थित होत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या दिवशी देण्यात येणारे वेतन गेल्या काही महिन्यांपासून पंधरा तारीख पर्यंतही मिळत नाही. त्यामुळे कामगार वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. यापूर्वीही कामगारांनी वेतन मिळवण्यासाठी अशाच प्रकारे संप पुकारला होता. काम बंद ठेवल्यानंतर नगराध्यक्ष व अधिकाऱयांनी त्वरीत हालचाली करून वेतन देण्याची व्यवस्था केली होती. कडक लॉकडाऊनच्या पूर्ण काळातही सफाई कामगारांनी न चुकता जीव धोक्यात घालून सफाईची कामे उरकलेली आहेत. आजही ते सफाईची कामे न चुकता करीत आहेत. मात्र, त्यांची कोविड चाचणीही करावी असे कुणाला वाटलेले नाही. काम करूनही वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे बँकांची कर्जे, घरभाडे, घरखर्च कसा निभावावा असे प्रश्न दर महिन्याला उपस्थित होत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न कामगारांनी केला. कामगारांच्या अन्य आर्थिक मागण्याही प्रलंबीत आहेत. सणासुधीचे दिवस जवळ आलेले आहेत. त्यामुळे वेतनापासून कसे जगावे असा प्रश्न कामगारांनी केला आहे.
गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
काल संपाचा पहिला दिवस होता. त्यामुळे कामगारांच्या काम बंदचा फारसा परीणाम दिसून आला नाही. मात्र, आजचा दुसरा दिवसही सफाईची कामे बंद राहिल्यास वास्को शहर व परीसरात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच खालावली होती. त्यातच लॉकडाऊनचा काळ आल्याने पालिकेसमोर गंभीर आर्थिक पेच निर्माण झालेला आहे. मोठय़ा प्रमाणात पालिकेचा महसुल अडकून पडलेला असून शासकीय मदतही मिळू शकलेली नाही. पालिका कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ठोस महसुल स्त्रोत निर्माण करण्यावर मागच्या काही पालिका बैठकीत चर्चा झालेली आहे. मात्र, असा कोणताही ठोस मार्ग पालिकेला अद्याप सापडलेला नाही. मुरगाव पालिकेची आर्थिक कोंडी पालिका कामगारांच्या मुळावर येत आहे. त्यात त्यांच्या कुटुंबांची होरपळ होत आहे.
नगराध्यक्षांकडून कामगारांना वेतन देण्याचे आश्वासन
कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नी स्पष्टीकरण देताना मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले की, सोमवारी आपण या प्रश्नी पालिका प्रशासकीय संचालकांची भेट घेतली आहे. त्यांनी वेतनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेले असून हा प्रश्न संपल्यातच जमा आहे. मात्र, सध्या वेतन वितरीत करण्याच्या कामातील एक कर्मचारी कोरोना पेझिटिव्ह असल्याने तो उपलब्ध नाही. तर दुसरा संबंधीत कर्मचारी कामावरच आलेला नाही. फोनवरही तो उपलब्ध नाही. मी व मुख्याधिकाऱयांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो सापडू शकलेला नाही. हे कर्मचारी कामावर हजर होताच कामगारांना त्यांचे वेतन देण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली. कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.









