कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार : तालुक्यात चिंतेचे सावट
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले तालुक्यात एकाच दिवशी 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शंभरी पार केली आहे. आतापर्यत एकूण 105 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रविवारी सापडलेल्या रुग्णांपैकी चार नवीन रुग्ण असून अन्य 30 जण हे अगोदर सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत.
शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळीपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात शिरोडा येथील 5, मोचेमाड येथे 11, न्हैचिआडमध्ये 6, वेंगुर्ले-राऊळवाडा येथे 8 रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण येथे पूर्वी मिळालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत. तर आरवली सोन्सुरेत एक नवीन स्थानिक रुग्ण सापडला आहे. शिरोडा केरवाडा येथे गोव्यावरुन आलेला व क्वारंटाईन असलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. खवणे येथे घर असलेल्या मालवण येथील आरोग्य कर्मचाऱयाचा व मालवण येथील 108 गाडीवर ड्रायव्हर असलेल्या परुळे येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा अशा एकूण 34 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, वेंगुर्ले पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, त्या-त्या भागातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य यांनी भेट देऊन पाहणी केली. सदरचे भाग कंटेनमेंट झोन म्हणून तहसीलदार लोकरे यांनी जाहीर केले. कोरोनाचे रुग्ण मिळण्यास जिल्हय़ात मार्चपासून सुरुवात झाली. जुलैपर्यंत वेंगुर्ले तालुक्यात चारच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले होते. मात्र, ऑगस्टपासून वेंगुर्ल्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला. आता ही संख्या 105 वर गेली आहे. ऑगस्ट महिन्यातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शंभरी पार केली. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे









