वार्ताहर / सातार्डा:
वेंगुर्ले आगारातून सोडण्यात येणारी वेंगुर्ले-म्हापसा ही परतीची विशेष बस फेरी तातडीने सुरू न केल्यास शिरोडा एस. टी बसस्थानकावरून एकही बस फिरू देणार नाही. एस. टी. प्रशासनाने अचानक एस. टी. फेऱया रद्द करून प्रवाशांना नाहक त्रास देऊ नये, अन्यथा शिरोडा बसस्थानकावरून एकही बस सोडण्यात येणार नाही. एस. टी आगाराच्या अधिकाऱयांकडून सावळागोंधळ सुरू असल्याने वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत आक्रमक पवित्रा घेत एस. टी.च्या अधिकाऱयांना धारेवर धरले.
लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली वेंगुर्ले-म्हापसा ही बस फेरी वेंगुर्ले आगारातून दुपारी 3 वाजता मार्गस्थ करण्यात येत होती. सीमा खुल्या झाल्यानंतर आठ दिवस वेंगुर्ले-म्हापसा बस फेरी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यापासून बंद करण्यात आली आहे. पणजीहून सायंकाळी 5.15 वाजता मार्गस्थ होणाऱया पणजी-वेंगुर्ले एस. टी.ला प्रवाशांची गर्दी असते. रोजच्या भारमानाचा अहवाल एस. टी.च्या अधिकाऱयांना सादर केला जातो. पणजी-वेंगुर्ले एस. टी.ला प्रवाशांची गर्दी होत असल्याने वेंगुर्ले-म्हापसा ही बस फेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत होती. एस. टी. सुरू करण्यासाठीचे प्रवाशांचे निवेदन एस. टी.च्या अधिकाऱयांनी नाकारले होते. त्यानंतर वेंगुर्ले-म्हापसा एस. टी. फेरी सुरू करण्याचे निवेदन प्रवाशांनी उपसभापती सिद्धेश परब यांना सादर केले होते. वेंगुर्ले-म्हापसा बस फेरी पूर्ववतप्रमाणे सुरू न केल्यास शिरोडा बसस्थानकावरून एकही बस फिरू देणार नाही, असा इशारा परब यांनी दिला.









