भ्रष्टाचार निर्मुलन व सामाजिक संस्थेचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
वृध्दाप पेन्शनमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची कसून चौकशी करुन यामध्ये सामील असणाऱयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन व सामाजिक संस्था यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. नेम्मदी केंद्रमधील अधिकारी, संगणक ऑपरेटर यांच्यावर हे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्या व्यक्तीचे वय 40 ते 45 आहे त्यांचे वय 60 ते 65 दाखवून पेन्शन मंजूर करुन घेण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिकारी सामील आहेत. बेळगाव तालुक्मयामध्ये याचबरोबर इतर तालुक्मयातही हे एजंट सक्रिय आहेत. पेन्शन हवी असलेल्यांकडून 3 ते 5 हजार रुपये उकळले जात आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करुन संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.
उचगाव, एपीएमसी, काकती, बागेवाडी या परिसरातील नेम्मदी केंद्रातून हा सुळसुळाट सुरू आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनेक जण पेन्शन घेत आहेत. 40 ते 45 वयोगटातील जवळपास 80 हजारांहून अधिक जण पेन्शन घेत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. तेंव्हा आता संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांपासून वृध्दाप पेन्शन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही जणांनी निवेदनही दिलेत. तरी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. तेंव्हा आता या सर्व प्रकरणाची चौकशी करुन त्या अधिकाऱयांवर आणि ज्यांनी पेन्शन घेतली त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. भ्रष्टाचार निर्मुलन व सामाजिक संस्थेचे शिवाजी कागणीकर, ऍड. नामदेव मोरे, बसवंत कोले, डॉ. तानाजी पावले, डी. जे. ओऊळकर, पी. जे. देसाई, के. डी. पाटील, राहुल पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









