महांतेशनगर येथील घटना ; 4 तोळय़ाचे दागिने लांबविल्याने परिसरात खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी दूध घेऊन घरी जाणाऱया वृद्धेच्या गळय़ातील चार तोळय़ाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महांतेशनगर, एसबीआय बँकेजवळ ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलीस असल्याचे सांगून वृद्धांच्या अंगावरील दागिने पळविल्याची घटना ताजी असतानाच चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला आहे. कविता उमाशंकर डोळ्ळी (वय 60, रा. महांतेशनगर-महांतभवनजवळ) यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत
आहेत.
कविता या दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दूध घेऊन घरी परतताना एसबीआय बँकेजवळ समोरून मोटारसायकलवरून दोघेजण आले. कविता यांच्या जवळ येताच मोटारसायकलचा वेग कमी झाला. पाठीमागे बसलेल्या भामटय़ाने त्यांच्या गळय़ातील चार तोळय़ांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर ते दोघे तेथून फरारी झाले.
कविता यांनी आरडाओरडा करताच घटनास्थळी गर्दी जमली. त्याआधीच भामटय़ांनी तेथून पलायन केले होते.
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. भामटय़ांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही.
परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत. अलीकडे चेन स्नॅचिंगचे प्रकार पूर्णपणे थांबले होते. एकेकाळी इराणी टोळीतील गुन्हेगारांनी बेळगाव शहर व उपनगरांत अक्षरशः हैदोस घातला होता. माळमारुतीचे यापूर्वीचे पोलीस उपनिरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी पुणे, अहमदनगर येथील इराणी टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळल्या होत्या. त्यानंतर चेन स्नॅचिंगचे प्रकार जवळजवळ थांबले होते. आता पुन्हा चेन स्नॅचिंगचे प्रकार सुरू झाले आहेत.









