जिल्हाधिकाऱयांनी पुढाकार घेण्याची केली सूचना
वार्ताहर/ काकती
राणी चन्नम्माने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा अविस्मरणीय असून तिच्या जीवन चरित्राचा आदर्श घेण्यासाठी तिच्या जन्मगावी तिचे ऐतिहासिक संग्रहालय बांधण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या संगोळ्ळी रायण्णा आदी क्रांतिकारकांचे गौरवोद्गार खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी काढले. राणी चन्नम्मा विजयोत्सव शनिवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठय़ा थाटात राचय्या स्वामी, उदयस्वामी हिरेमठ यांच्या उपस्थितीत झाला.
कार्यक्रमाची सरुवात नाडगीताने झाली. प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर जिल्हधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन, जि. पं. कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., ता. पं. अधिकारी राजेश दणवाडकर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, माजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, कित्तूर चन्नम्मा संशोधन अकादमीचे येडुप्पण्णवर, बीजेपीचे नेते शशिकांत नाईक, उपतहसीलदार राकेश बुवा होते.
प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना खासदार जोल्ले पुढे म्हणाले, काकती देसाईवाडा खरेदीस जिल्हाधिकाऱयांनी पुढाकार घ्यावा. याठिकाणी ऐतिहासिक संग्रहालय करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवितो, असे सांगितले. तशी मागणी करण्याचे आश्वसन त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी राणी चन्नम्माच्या जन्मगावी तिच्या माहेरच्या वाडा खरेदी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राणी चन्नम्माचा देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा क्रांतिकारी आदर्श सर्वांना देशप्रेम जागविणारा आहे. जि. पं. माजी सदस्य सिद्दगौडा सुणगार, ता. पं. माजी सदस्य यल्लाप्पा कोळेकर, डॉ. एस. डी. पाटील आदींनी देसाईवाडा तसेच राष्ट्रीय महामार्ग राणी चन्नम्मा जन्मगावी स्वागत कमान आणि पडझड झालेल्या किल्ल्याचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी करण्यात आली.
विजयोत्सव मिरवणुकीत बैलजोडीसह भाग घेतल्याबद्दल व्हळय़ाप्पा दड्डी यांचा चन्नाप्पा पुराणिकमठ यांनी बैलहोंगलहून ज्योत आणल्याबद्दल लक्ष्मण कोळेकर आदींचा सत्कार करण्यात आला. सकाळी सव्वा आठच्या सुमारास जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून विजयोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. बैलहोंगलहून आणलेल्या ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, राजवाडय़ातील दरबारी अधिकारी आदींनी पारंपरिक वेशभूषा केली होती.
चित्ररथ, झांजपथक, बँड, धनगरी ढोल अशा वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीतत हजारो नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. कुंभकलश होईवर घेऊन सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. राणी चन्नम्माच्या पुतळय़ाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. खासदार जोल्लेसह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आभार प्रदर्शनाने सांगता झाली. सूत्रसंचालन रमेश गोणी यांनी केले.









