प्रतिनिधी/ बेळगाव
कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचा साथीदार बिल्वेंद्रचा म्हैसूर येथे मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्याला म्हैसूर येथील के. आर. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे. तब्बल दहा वर्षे तो हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत होता.
बिल्वेंद्र मोरेश गौंडर (वय 70) मूळचा राहणार चंदनपाळय़म-मार्टळ्ळी, ता. कोळ्ळेगल, जि. चामराजनगर असे त्याचे नाव आहे. बिल्वेंद्र हा वीरप्पनचा विश्वासू साथीदार होता. 22 जणांचा बळी घेणाऱया पालार बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती.
पाच दिवसांपूर्वी म्हैसूर कारागृहातील आपल्या बराकीत तो अचानक कोसळला. त्यामुळे त्याला तातडीने के. आर. इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
रामापूर पोलीस स्थानकावर हल्ला करून वीरप्पनने पाच पोलिसांची हत्या केली होती. त्यावेळी वीरप्पनसोबत बिल्वेंद्र होता. म्हैसूरचे तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख हरेकृष्ण, पोलीस उपनिरीक्षक शकील अहमद आदी 22 अधिकाऱयांचा जीव घेणाऱया 9 एप्रिल 1993 रोजी झालेल्या पालार बॉम्बस्फोटावेळीही बिल्वेंद्र वीरप्पनच्या सोबत होता. खरे तर हा स्फोट सायमनने घडवला होता. सायमनला या साऱयांनी मदत केली होती.
5 फेब्रुवारी 2004 रोजी बिल्वेंद्रला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर केवळ पाच दिवसांत 10 फेब्रुवारी 2004 रोजी वीरप्पन टोळीतील फाशीची शिक्षा झालेल्या चौघा जणांना हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. म्हैसूर येथील टाडा न्यायालयाने या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांनी उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले होते. त्यावेळी न्यायालयाने जन्मठेप ऐवजी फाशीची शिक्षा ठोठावली होती.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मिसेकार मादय्या, बिल्वेंद्र, ज्ञानप्रकाश, सायमन यांना फाशी देण्याची पूर्ण तयारी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने फाशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर झालेल्या न्यायालयीन लढाईत फाशी रद्द करून जन्मठेप कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे 22 जून 2014 रोजी या चौघा जणांना हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून म्हैसूरला हलविण्यात आले होते. तब्बल दहा वर्षे हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलेल्या बिल्वेंद्रचा म्हैसूरमध्ये मृत्यू झाला आहे.









