पन्हाळा / प्रतिनिधी :
पन्हाळागडावर सुरु असलेला पाऊस, घनदाट धुके, अंगाला झोंबणारा थंडगार वारा. त्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय…!नरवीर शिवा काशीद की जय…! वीर बाजीप्रभू की जय….! या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता. यामुळे नरवीर शिवाकाशीद यांनी दिलेल्या बलिदानाच्या रोमांचकारी आठवणीला उजाळा मिळाला. नरवीर शिवाकाशीद यांच्या 361 व्या पुण्यतिथी निमित्त अशा ऐतिहासिक वातावरणात स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या साहसवीराला अभिवादन करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे शासनाच्या अटींचे पालन करत शिवाकशीद यांच्या समाधीस्थळी आज कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पन्हाळा नगरीच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, कोल्हापुर जिल्हा नाभिक समाजाचे सयाजी झुंजार, भिमराव काशीद, भगवान चित्ते(धुळे) यांच्या हस्ते अभिषेक व समाधी पुजन करण्यात आले. यानंतर पन्हाळा येथील जकात नाक्या जवळील शिवाकाशीद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच वीरबाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संवर्धन समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष विश्वास गंगधर, पन्हाळा तालुकाध्यक्ष सदाभाऊ सुर्यवंशी, करवीर तालुकाध्यक्ष बाळासो साळोखे, पन्हाळा शहराध्यक्ष रविंद्र काशीद, माजी नगराध्यक्ष सुनील काशीद, शिवाकाशीद यांचे धेट वंशज प्रविण काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे झाले शिवाकाशीद यांची पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. यावर्षी देखील शासनाच्या अटींचे पालन करत पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. तरी पुढीलवर्षी परिस्थितीत सुधारणा झाल्यास मोठ्या उत्साहात पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प नाभिक समाजाचे प्रमुख सयाजी झुंझार यांनी यावेळी केला.









