6 तास शहरात वीजपुरवठा ठप्प : उद्योगांना पुरविली 50 टक्के वीज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराला वीजपुरवठा करणाऱया वाहिन्यांमध्ये मंगळवारी अचानक बिघाड झाल्याने शहर व परिसरात तब्बल 6 तास वीजपुरवठा ठप्प होता. वडगाव व सुवर्णविधानसौध येथील दोन्ही विद्युत केंद्रांना वीजपुरवठा करणाऱया वाहिन्यांमध्ये एकाचवेळी बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी केपीटीसीएलचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत होते. दुपारी 2 नंतर टप्प्याटप्प्याने शहरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
नेहरुनगर येथील उपकेंद्रातून वडगाव उपकेंद्राला जोडणाऱया विद्युतवाहिनींमध्ये सकाळी 7 च्या सुमारास बिघाड झाला. याच सुमारास एम. के. हुबळी येथून हालगा येथील सुवर्णविधानसौध स्टेशनमध्ये वीजपुरवठा करणाऱया विद्युतवाहिनींमध्ये बिघाड झाला. शहराला वीजपुरवठा करणारी दोन महत्त्वाची उपकेंदे बंद असल्याने शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरू होता. परंतु उपनगरांमध्ये वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले.
वर्क फ्रॉम होम करणाऱयांना फटका
वडगाव येथील स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, अनगोळसह ग्रामीण भागातील लाईट गुल झाली. सकाळीच वीज नसल्याने नोकरदार तसेच व्यावसायिकांची तारांबळ उडाली. महिलांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱयांना याचा चांगलाच फटका बसला.
उद्यमबागला तात्पुरत्या स्वरूपात वीज
अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्याने उद्योजकांचे नुकसान होऊ नये यासाठी उद्यमबाग परिसरातील कारखान्यांना 50 टक्के वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला. पिरनवाडी स्टेशनमधून तात्पुरत्या स्वरूपात वीज उद्यमबागला देण्यात आली. याचसोबत दक्षिण भागातील कोविड सेंटर व हॉस्पिटल यांचा वीजपुरवठा सुरळीत पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दुरुस्तीसाठी शर्थीचे प्रयत्न
वडगाव व सुवर्णविधानसौध या दोन्ही केंद्रांना वीजपुरवठा करणाऱया विद्युतवाहिन्यांमध्ये मंगळवारी सकाळी अचानक बिघाड झाला. यामुळे शहर व उपनगरांमध्ये काहीकाळ वीज नव्हती. केपीटीसीएलच्या कर्मचाऱयांनी दुरुस्तीसाठी शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला.
– एम. टी. अप्पण्णावर (कार्यकारी अभियंते, हेस्कॉम शहर)









